वृत्तसंस्था : विनोदी भूमिकांसाठी प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण करणारा अभिनेता गौरव मोरे अखेर स्वतःच्या घराचा मालक झाला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि ‘हवा येऊ द्या’सारख्या लोकप्रिय शोजमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या गौरवने आपल्या मेहनतीच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली. आता त्याच्या आयुष्यातील आणखी एक मोठा टप्पा पूर्ण झाला आहे. फिल्टरपाड्याच्या चाळीतून आलिशान टॉवरमध्ये जाण्याचे त्याचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. गेल्या वर्षी म्हाडाच्या मुंबई मंडळाने २,०३० घरांसाठी सोडत काढली होती. या लॉटरीत गौरवने कलाकार कोट्यातून अर्ज दाखल केला होता. सोडतीत तो भाग्यवान ठरला आणि पवई येथील घर त्याच्या नावावर लागले. इमारत बांधकामाधीन असल्यामुळे आणि ओसी मिळण्यात विलंब झाल्याने त्याला घराच्या चाव्यांसाठी तब्बल एक वर्ष प्रतीक्षा करावी लागली. अखेर आता त्याला घराची चावी मिळाली असून त्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
फिल्टरपाड्याच्या साध्या चाळीत वाढलेला गौरव मोरे आज मराठी मनोरंजन विश्वातील ओळखीचे नाव बनला आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या त्याच्या भूमिकांनी घराघरात लोकप्रियता मिळवून दिली. आयुष्यातील अनेक संघर्षांनंतर आज त्याने मिळवलेले हे घर त्याच्या मेहनतीची साक्ष आहे. “चाळीतून टॉवरमध्ये” हा त्याच्या जीवनप्रवासाचा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.