वृत्तसंस्था : लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाचे फीचर जाहीर केले आहे. आता स्टोरी पोस्ट केल्यानंतर ती डिलीट न करता थेट एडिट करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे स्टोरी पोस्ट करताना झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी पुन्हा स्टोरी अपलोड करण्याची गरज भासणार नाही. विशेष म्हणजे, एडिट केल्यानंतरही स्टोरीवरील व्ह्यूज, लाईक्स आणि रिप्लाय यामध्ये कोणताही बदल होणार नसून ते पूर्ववत सुरक्षित राहतील. इंस्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी यांनी या फीचरची माहिती देताना सांगितले की, स्टोरी अपलोड केल्यानंतर वापरकर्त्यांना टेक्स्ट, म्युझिक, स्टिकर्स आणि ड्रॉइंगमध्ये बदल करण्याची सुविधा मिळेल. मात्र, हा पर्याय स्टोरी पोस्ट केल्यानंतर केवळ १५ मिनिटांसाठीच उपलब्ध असेल. त्यामुळे अल्पावधीत झालेल्या चुका सहज दुरुस्त करता येणार असून, विशेषतः कंटेंट क्रिएटर्स आणि नियमित स्टोरी शेअर करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी हे फीचर अधिक उपयुक्त ठरणार आहे.
स्टोरी एडिट करण्यासाठी वापरकर्त्यांनी प्रथम इंस्टाग्राम अॅप उघडून स्वतःची अपलोड केलेली स्टोरी निवडायची आहे. त्यानंतर स्क्रीनवरील तीन डॉट्स मेन्यूवर क्लिक करून Edit हा पर्याय निवडावा. यानंतर स्टोरीतील टेक्स्ट, म्युझिक, स्टिकर्स आणि ड्रॉइंगमध्ये आवश्यक ते बदल करता येतील. याशिवाय, इंस्टाग्राम स्टोरीचा अनुभव अधिक आकर्षक करण्यासाठी स्टिकर्समध्ये नवीन फॉन्ट, रंग आणि विविध आकारांचा समावेश केला जात आहे. स्टिकर्ससाठी वेगवेगळ्या शीट्स उपलब्ध करून दिल्या जाणार असून, त्यामुळे वापरकर्त्यांना पसंतीनुसार डिझाइन निवडणे अधिक सोपे होईल. तसेच, एकापेक्षा अधिक फोटो निवडण्याच्या प्रक्रियेतही सुधारणा करण्यात येत आहे. नव्या अपडेटमध्ये ब्लर इफेक्ट, आकर्षक रंगसंगती आणि ग्रेडिएंट बॅकग्राउंडसारखे पर्यायही जोडले जाणार आहेत. या सर्व बदलांमुळे इंस्टाग्राम स्टोरी अधिक सर्जनशील, आकर्षक आणि वापरण्यास सोपी होणार असून, कंटेंट क्रिएशनचा अनुभव आणखी समृद्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

