मुंबई : राज्यभर मराठी आणि हिंदी भाषिका वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. राज्य सरकारचा शिक्षण क्षेत्रातील निर्णय, मनसेचं भाषा धोरण आणि सोशल मीडियावरील पोस्ट यामुळे हा मुद्दा चांगलाच पेटला आहे. त्यातच मुंबईतील एका प्रसिद्ध व्यावसायिकाने थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उद्देशून “मी मराठी शिकणार नाही, काय करायचंय ते करा!”, असा धमकी वजा इशारा दिला आहे. त्यामुळे वाद चिघळण्याची शक्यता आहे. मुंबईत गेल्या तीन दशकांपासून वास्तव्यास असलेले आणि आर्थिक विषयांवरील सल्लागार म्हणून प्रसिद्ध असलेले सुशील केडिया यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये मराठी शिकण्यास नकार देत, मनसेच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी लिहिलंय की, “राज ठाकरे, मी मुंबईत ३० वर्षांपासून राहतो, पण अजूनही मराठी शिकलेलो नाही आणि आता तुमचं बेफाम वर्तन पाहता मी ठरवलंय की तुमच्यासारखे लोक मराठीच्या नावावर राजकारण करणार असतील, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही.”, असं त्यांनी म्हटलं आहे.
केडिया पुढे म्हणाले की, मराठी न शिकणे ही भाषा किंवा मराठी माणसाचा अपमान नाही, पण मराठीच्या नावाखाली जर राजकारण, दडपशाही आणि हिंसाचार केला जात असेल तर त्याला विरोध करणे आवश्यक आहे. “मराठी शिकणं चुकीचं नाही, पण तिच्या नावाखाली हलक्या दर्जाचं राजकारण केलं जातंय, ही चिंतेची बाब आहे,” असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. केडियांच्या या भूमिकेला अनेकांनी विरोध केला. एका युजरने कमेंट करत म्हटलं की, “मराठीचा अपमान करणाऱ्यांना विरोध होतो, पण नम्रतेने बोलणाऱ्यांना कोणीही त्रास देत नाही.” त्यावर केडिया यांनी संतप्त प्रत्युत्तर देत म्हटलं, “गप्प बसा! गुंडगिरीचं समर्थन करणं थांबवा. सामान्य माणसे अशा प्रकारचं वर्तन करत नाहीत, ते फक्त अयशस्वी राजकारणी करतात. माफी मागा किंवा तुरुंगात जा.”, असं त्यांनी सुनावलं आहे. आता यावर मनसे काय प्रतिक्रिया देणार हे पाहण महत्त्वाचं आहे.

