महाराष्ट्र : यंदा जुलै महिन्यापासून सातत्याने पाऊस होत आहे. तर साधारण महिनाभरापासून जोरदार पाऊस होत असल्याने अनेक भागात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीने हजारो गवे बाधित झाले असून १ हजार ४१८ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मागच्या आठवडाभरापासून मराठवाड्यातल्या सगळ्याच भागात अतिवृष्टी, ढगफुटी सारखा पाऊस झाल्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. शिवाय शेत जमिनी वाहून गेल्या आहेत. अनेक घरांची पडझड झाली. यामुळे मराठवाड्यात १४१८ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून या नुकसानीसाठी पन्नास टक्के म्हणजेच ६३० कोटींची मदत शासनाने १८ सप्टेंबरपर्यंत मंजूर केल्याचे सांगण्यात येत आहे. मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील ऑगस्ट महिन्यातील नुकसानीचे आकडे अद्याप स्पष्ट नाहीत. तसेच अद्याप सप्टेंबरमधील नुकसानीचा आकडा समोर आला नाही. सर्वाधिक नुकसान हे सप्टेंबर महिन्यात झाले आहे. शिवाय सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनाम्यानुसार किती मदत लागणार, हे स्पष्ट नाही. आतापर्यंत ५ हजार गावांतील १९ लाख शेतकरी बाधित झाले.