ठाणे : सध्या पश्चिम आशियातील देशांमध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण लष्करी संघर्षामुळे जगभरात इंधन पुरवठ्याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा काही ठिकाणी पसरू लागल्या आहेत. मात्र अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू आहे, असे स्पष्ट करत ठाणे जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी विशेष नियंत्रण कक्ष आणि मदत क्रमांक जाहीर केले आहेत. यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९३७२३३८८२७ तसेच दूरध्वनी क्रमांक ०२२-२५३०१७४० जाहीर करण्यात आले आहेत.
ठाणे जिल्हा पुरवठा कार्यालय यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. नागरिक, प्रसारमाध्यमे, गॅस ग्राहक तसेच लोकप्रतिनिधी यांना गॅस पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण, तक्रार किंवा शंका असल्यास या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येणार आहे. यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर करण्यात आले आहे. सध्या समाज माध्यमांवर तसेच काही ठिकाणी गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्याने अनेक नागरिक गॅस सिलेंडरचे आगाऊ बुकिंग करत आहे. यामुळे वितरण व्यवस्थेवर अनावश्यक ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून किंवा अफवांवर विश्वास ठेवून अतिरिक्त गॅस सिलेंडर बुक करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

