वृत्तसंस्था : नवरात्रोत्सव तोंडावर आलेला असतानाच त्यानिमित्तानं आयोजित केल्या जाणाऱ्या रास गरबा कार्यक्रमांचीसुद्धा तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र काही रास गरब्याच्या कार्यक्रमांमध्ये प्रवेशासाठी ठेवण्यात आलेल्या निकषांनी अनेकांचच लक्ष वेधलं आहे. कारण, दांडिया आणि गरबा हा फक्त हिंदूंसाठीच असल्याचं मत विश्व हिंदू परिषदेनं मांडलं आहे.
‘नवरात्रीत दांडिया आणि गरबा फक्त हिंदूंसाठीच आहे. त्यामुळे हिंदूंनाच प्रवेश देण्यात यावा’ असा थेट आवाहन विश्व हिंदू परिषदेनं केला आहे. आयोजकांकडे हे आवाहन करण्यात आलं असून, कार्यक्रमस्थळी येताना मंडपात प्रवेश करणारी व्यक्ती हिंदूच आहे, याची खात्री करण्यासाठी त्यांचं आधारकार्ड तपासावं शिवाय प्रत्येकाला टिळा लावावा, असंही ‘विहिंप’ कडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तेव्हा दांडिया, गरब्यासाठी मुस्लिमांना प्रवेश मिळणार नसल्याची चर्चा सध्या पाहायला मिळत आहे. गतवर्षाप्रमाणं यंदासुद्धा हे अभियान राबवण्यात येणार असून, यंदासुद्धा आपली भूमिका अगदी स्पष्ट असावी असं परिषदेकडून स्पष्ट करण्यात आलं असून, आयोजकांनी प्रत्येकाचं आधार कार्ड तपासूनच प्रवेश द्यायला हवा असा आग्रही सूर त्यांनी आळवला. विहिंपच्या या मागणीमुळं आता उत्सवामध्येही मतमतांतरं पाहायला मिळत आहेत. विदर्भता बहुतांश नवरात्रोत्सव मंडळं असून, अनेक ठिकाणी गरबा आणि दांडियाचं आयोजन केलं जातं. मात्र याचदरम्यान गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकही अशा कार्यक्रमांमध्ये गैरप्रकार करण्याची संधी साधतात ही बाब अधोरेय़खित करत ही कार्यक्रमस्थळं CCTV च्या निरीक्षणाअंतर्गत यावील अशीही मागणी केली जात आहे.