नवी मुंबई : नवी मुंबई आणि ठाणे परिसरातून सायबर गुन्हेगारीची घटना समोर आली आहे. एकाच दिवशी म्हणजेच १० ऑक्टोबर २०२५ रोजी, कळंबोली, कामोठे, सायबर पोलीस ठाणे, कोपरखैरणे आणि न्हावाशेवा या पाच ठाण्यांत एकापाठोपाठ एक असे सायबर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. विविध प्रकारच्या ऑनलाईन गुंतवणुकींच्या नावाखाली तब्बल १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम नागरिकांकडून लुबाडण्यात आल्याचे समोर आले आहे.
पहिली घटना कळंबोली येथे घडली. सेवानिवृत्त नागरिक सौरेन्द्रनाथ चक्रवर्ती (६२) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आरोपींनी त्यांना शेअर मार्केट ट्रेंडिंगमध्ये अधिक नफा मिळेल असे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर ऑनलाईन व्हायव्हरांच्या माध्यमातून चक्रवर्ती यांच्या खात्यातून ₹44,70,009 इतकी रक्कम आरोपींनी फसवून घेतल्याची नोंद आहे. या प्रकरणी गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66(D) अन्वये नोंदवला असून, तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कांबळे यांच्या कडे आहे. कामोठे येथील रहिवासी चेतन सदाशिव पाटील (४४) यांना “Savart Wealth Growth Community” आणि “Savart 1 to 1 Service” या नावाने तयार केलेल्या फेक WhatsApp ग्रुपमध्ये सामील करून गुंतवणुकीवर पाच ते दहा पट नफा मिळेल असे सांगण्यात आले. फिर्यादीकडून विविध बँक खात्यातून ₹16,54,000/- रक्कम भरून घेण्यात आली. मात्र त्यांना नफा न देता सायबर फसवणूक करण्यात आली. गुन्हा भा.दं.वि. कलम ४२०, ४०७, ३४ व आयटी अॅक्ट ६६(D), ६६(C) प्रमाणे दाखल करण्यात आला असून तपास वपोनि विमल बिडवे करत आहेत.
नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, अश्विन गुरव (४१) या नवी पनवेल येथील नोकरी करणाऱ्या व्यक्तीला ‘मराठी मॅट्रीमोनी’ वेबसाईटवरून संपर्क साधून फेक ट्रेडिंग वेबसाईट (pc.marketaxesa.com) वर गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले. गुंतवणुकीसाठी लिंक व खोटे कस्टमर केअर क्रमांक देत आरोपींनी फिर्यादीकडून ₹53,70,000/- इतकी रक्कम उकळली. सायबर पोलिसांनी या प्रकरणी BNS कलम ३१८(४), ३१९(२), ३(५) व IT Act 66(D) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तपास वपोनि विशाल पाटील यांच्या कडे आहे. कोपरखैरणे येथे राहणाऱ्या श्रीमती विनीता साईगणेश (५५) या गृहिणीने Facebook वर पाहिलेल्या स्टॉक मार्केटच्या व्हिडिओवर विश्वास ठेवला आणि दिलेली लिंक क्लिक केली. त्यानंतर IIFL Securities Limited नावाच्या खोट्या WhatsApp ग्रुपची अॅडमिन बनून एका अनोळखी महिलेनं त्यांना फसवलं. “IPO” आणि “Block Trading” या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ₹7,76,250/- रुपये भरायला लावून परत न केल्याने तक्रार दाखल झाली आहे. गुन्हा IT Act 66(C) अंतर्गत दाखल झाला असून, तपास पोउपनि गजानन टाकळे करत आहेत. न्हावाशेवा पोलीस ठाण्यांत दाखल प्रकरणानुसार, प्रतिभा हरले (४२) या गृहिणीला आरोपी गायत्री लोंढेकर हिने शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये दोन ते चार महिन्यांत दुहेरी रक्कम मिळेल, असे आमिष दाखवले. फिर्यादी, त्यांच्या पती दिनेश हरले आणि साक्षीदार पुनम चौधरी यांच्याकडून एकत्रितपणे ₹58,05,000/- इतकी रक्कम घेतली. त्यातील केवळ थोडी रक्कम “परतावा” म्हणून दिल्यानंतर आरोपीने उर्वरित पैसे परत केले नाहीत. हा गुन्हा महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण अधिनियम १९९९ कलम ३ आणि भा.दं.वि. ४२०, ४०६ प्रमाणे दाखल करण्यात आला असून तपास सपोनि गणेश पाटील यांच्या कडे आहे.