ठाणे : भारतीय संविधानातील लोकशाही मूल्यांची जपणूक, संविधानाविषयी जनजागृती आणि नागरिकांमध्ये संविधानिक अधिकार व कर्तव्यांची जाणीव अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्हा परिषदेत गुरुवारी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून भारतीय राज्यघटनेप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. त्यानंतर उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करत समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या संविधानाने दिलेल्या मूलभूत मूल्यांचे पालन करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे यांनी मार्गदर्शन करत संविधान हे केवळ वाचण्यापुरते मर्यादित नसून ते प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले पाहिजे, असे सांगितले. भारतीय राज्यघटना ही देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा आत्मा असून, संविधानाने दिलेले अधिकार, कर्तव्ये आणि मूल्ये प्रत्येक नागरिकाने आपल्या आचरणातून जपली पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले.
संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला प्रदान केलेले समानतेचे, स्वातंत्र्याचे, न्यायाचे आणि बंधुत्वाचे मूल्य समाजात अधिक दृढ करण्याचे आवाहन करण्यात आले. संविधानाचा अभ्यास करून त्यातील मूलभूत तत्त्वे समाजजीवनात रुजविणे आणि अधिकारांबरोबरच नागरिक म्हणून कर्तव्यांचेही प्रामाणिकपणे पालन करणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, शिक्षण अधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरुडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परगे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबाक) शोभा शेलार, समाज कल्याण अधिकारी उज्वला सपकाळे, गटविकास अधिकारी (मनरेगा/व्हीबी-ग्रॅमजी) प्राची साळसकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपावेळी उपस्थितांनी संविधानाच्या उद्देशिकेतील मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त करत लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासन अधिक प्रभावी करण्याचा संकल्प केला. संविधानातील आदर्श मूल्ये आत्मसात करून समाजहित आणि राष्ट्रहितासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करत संविधान दिन उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.

