भिवंडी : शहरातील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेने दर बुधवारी १८ तासांची पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे धरणांतील जलसाठा झपाट्याने घटला असून, उपलब्ध पाणीसाठा पुढील वर्षी ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरवण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. या निर्णयानुसार पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम (STEM) प्राधिकरणाकडून दर बुधवारी सकाळी ९ वाजल्यापासून गुरुवारी पहाटे ३ वाजेपर्यंत १८ तासांचा अधिकृत शटडाउन घेतला जाणार आहे. शटडाउननंतर गुरुवारीही शहरातील पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सलग दोन दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. अल-निनोच्या संभाव्य परिणामांमुळे राज्य शासनाने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना दिल्या असून, त्यानुसार शहरात सुमारे १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.
महापालिकेने पाणी बचतीसाठी उद्योग क्षेत्रालाही काही नियम लागू केले आहेत. स्थानिक कंपन्या आणि उद्योगांनी त्यांच्या एकूण पाणी वापरापैकी किमान ३० टक्के पाण्याचा पुनर्वापर (रीसायकल/रियुज) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यावरील ताण कमी होण्यास मदत होईल, असा प्रशासनाचा विश्वास आहे. दरम्यान, भिवंडी महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता संदीप पटनवार यांनी नागरिकांना पाण्याचा वापर अत्यंत जपून करण्याचे, अनावश्यक पाणी वाया न घालवण्याचे तसेच आवश्यकतेनुसार पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे. आगामी काळात पाण्याची उपलब्धता सुरळीत राहण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
