वृत्तसंस्था : बनावट बँक हमी प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अंमलबजावणी संचालनालयाने (ED) रिलायन्स अनिल अंबानी ग्रुप ऑफ कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) आणि कार्यकारी संचालक अशोक कुमार पाल यांना अटक केली आहे. कथित बँक कर्ज फसवणूक आणि रिलायन्स समूहाच्या विविध कंपन्यांद्वारे एकूण ₹१७,००० कोटींहून अधिक रक्कमेचे अन्यत्र वळवण्याच्या मनी लाँड्रिंगच्या आरोपांप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.
कंपनीच्या वेबसाइटनुसार, अनिल अंबानी यांचे जवळचे सहकारी मानले जाणारे अशोक कुमार पाल यांनी सात वर्षांहून अधिक काळ रिलायन्स पॉवरचे मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून काम केले आणि त्यांना २५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. ईडीची ही कारवाई आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या अनिल अंबानी समूहासाठी एक मोठा धक्का मानली जात आहे.