मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) सुमारे ८३ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीपूर्वीच नोव्हेंबर महिन्याचे वेतन मिळणार आहे. कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी वेतन वेळेपूर्वी त्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला दिले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना दरमहा ७ ते १० तारखेच्या दरम्यान वेतन दिले जाते. मात्र, यंदा ६ नोव्हेंबरपासून दिवाळी सुरू होत असल्याने कर्मचाऱ्यांना सणाची खरेदी, घरगुती खर्च आणि इतर नियोजनासाठी वेळेत पगार मिळावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
दिवाळीपूर्वी वेतन अदा करण्यासाठी एसटी महामंडळाच्या अर्थ व नियोजन विभागाने राज्य शासनाकडे आवश्यक अनुदान आणि विविध प्रवासी सवलतींपोटी मिळणारी प्रलंबित रक्कम तातडीने उपलब्ध करून घेण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एसटीच्या आर्थिक अडचणींचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या सणावर होऊ नये, याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देशही सरनाईक यांनी दिले. शासनाशी समन्वय साधून प्रत्येक कर्मचाऱ्याच्या खात्यात दिवाळीपूर्वी वेतन जमा होईल, यासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

