मुंबई : गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाच्या कामासाठी मुंबई महापालिकेने १,५२४ वृक्षांवर कारवाई करण्याची तयारी सुरू केली असून, त्यामध्ये ६९५ झाडे तोडणे आणि ६६६ झाडांचे पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग ते ऐरोली टोलनाका दरम्यान जोडरस्त्याचे बांधकाम तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावरील जंक्शनच्या रुंदीकरण आणि सुधारणेच्या कामासाठी ही वृक्षतोड प्रस्तावित करण्यात आली आहे. यासंदर्भात महापालिकेने हरकती आणि सूचना मागवण्यासाठी सार्वजनिक नोटीसही जारी केली आहे. मात्र, या प्रस्तावाला पर्यावरण क्षेत्रातून तीव्र विरोध सुरू झाला आहे. ‘वॉचडॉग फाउंडेशन’ने विकासकामांच्या नावाखाली होणारी मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोड मुंबईच्या पर्यावरणासाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचा इशारा देत हा प्रस्ताव तातडीने मागे घेण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे. शहरातील हरित आच्छादन कमी झाल्यास हवेची गुणवत्ता, तापमान आणि जैवविविधतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा दावा संस्थेने केला आहे.
यंदा ऑक्टोबर महिन्यात मुंबईत अनुभवास येत असलेली तीव्र उष्णता आणि दमट हवामान लक्षात घेता शहरात हरित क्षेत्र वाढवण्याची आवश्यकता अधिक असल्याचे ‘वॉचडॉग फाउंडेशन’चे अध्यक्ष ॲड. गॉडफ्रे पिमेंटा यांनी नमूद केले आहे. त्यांच्या मते, हवेतील प्रदूषण कमी करणे, तापमान नियंत्रणात ठेवणे आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी झाडांचे संरक्षण अत्यावश्यक आहे. अशा परिस्थितीत शेकडो वृक्ष तोडण्याचा निर्णय भविष्यात गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण करू शकतो. त्यामुळे विकास प्रकल्प राबविताना कमीत कमी वृक्षहानी होईल अशा पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, अशी मागणी संस्थेने केली आहे. तसेच मुंबईचे पर्यावरण आणि नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पक्षभेद बाजूला ठेवून या प्रस्तावित वृक्षतोडीला विरोध करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रस्तावावर नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

