नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर-२३ येथील सिडकोकालीन सुमारे ३५ वर्षे जुना उच्चस्तरीय जलकुंभ संरचनात्मकदृष्ट्या कमकुवत झाल्याने तो पाडून त्याठिकाणी नवीन तळस्तरीय आणि उच्चस्तरीय जलकुंभ उभारण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ११ कोटी ६ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, आर्थिक मंजुरीसाठीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. आयआयटी मुंबईच्या संरचनात्मक तपासणीत विद्यमान जलकुंभ दुरुस्त करण्यायोग्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. सध्या सेक्टर-१८ येथून बूस्टिंगद्वारे सेक्टर-२२ आणि २३ मध्ये पाणीपुरवठा केला जात असल्याने शेवटच्या टोकावरील सोसायट्यांना कमी दाबाने आणि अपुरे पाणी मिळत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ०.७५ दशलक्ष लिटर क्षमतेचा तळस्तरीय आणि १.१ दशलक्ष लिटर क्षमतेचा उच्चस्तरीय जलकुंभ उभारण्यात येणार आहे. याशिवाय पंपहाऊस, ऑपरेटर कक्ष, जलवाहिन्या आणि व्हॉल्व्ह बसविण्याची कामेही करण्यात येतील. या प्रकल्पासाठी चार निविदा प्राप्त झाल्या असून, त्यापैकी मे. मंगलमूर्ती एंटरप्रायझेस यांची सर्वात कमी दराची निविदा पात्र ठरली आहे. निविदेची मूळ रक्कम ९.३७ कोटी रुपये असून, जीएसटीसह एकूण खर्च ११.०६ कोटी रुपये होणार आहे. प्रशासकीय मंजुरीनंतर आता वित्तीय मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होताच पावसाळा वगळून सुमारे १० महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.
