ठाणे : प्रवाशांची आर्थिक लुबाडणूक रोखणे, निश्चित भाड्यात सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे आणि रिक्षा मिळविण्याचा त्रास कमी करणे या उद्देशाने ठाणे रेल्वे स्थानक परिसरात सुरू करण्यात आलेल्या प्रीपेड रिक्षा सेवेला अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. सेवा सुरू होऊन काही आठवडे उलटले असतानाही दिवसाला केवळ ८ ते १० प्रवासी या सुविधेचा वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे स्थानकाच्या पश्चिमेकडील सॅटीस पुलाखाली प्रीपेड रिक्षांसाठी स्वतंत्र रांग आणि कार्यालय सुरू करण्यात आले असून आतापर्यंत १०० हून अधिक रिक्षाचालकांनी या सेवेसाठी नोंदणी केली आहे. मात्र, कार्यालय सहज नजरेस न पडणे आणि या सुविधेबाबत पुरेशी जनजागृती न झाल्याने बहुतांश प्रवासी अजूनही पारंपरिक रिक्षांनाच पसंती देत आहेत. ठाणे हे रोजगार, उद्योग, मॉल आणि पर्यटनाचे केंद्र असल्याने दररोज हजारो प्रवासी येथे ये-जा करतात. अशा परिस्थितीत अवाजवी भाडे, रिक्षासाठी होणारी प्रतीक्षा आणि प्रवासी-रिक्षाचालकांमधील वाद कमी करण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली होती.
प्रादेशिक परिवहन विभागाने निश्चित केलेल्या दरानुसार पहिल्या चार किलोमीटरसाठी ९३ रुपये भाडे आकारले जाते, त्यानंतर प्रत्येक किलोमीटरनुसार अतिरिक्त शुल्क आकारले जाते. प्रीपेड रिक्षाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी कार्यालयात जाऊन गंतव्यस्थळाची माहिती द्यायची, ऑनलाइन भाडे भरायचे आणि मिळालेल्या पावतीवरील रिक्षा क्रमांकानुसार प्रवास सुरू करायचा असतो. संबंधित रिक्षाचालकाच्या बँक खात्यात त्याच दिवशी सायंकाळी भाड्याची रक्कम जमा केली जाते. या सुविधेमुळे भाड्यावरून होणारे वाद टाळण्यास मदत होत असली, तरी प्रवाशांचा प्रतिसाद वाढविण्यासाठी व्यापक जनजागृतीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनीही प्रीपेड रिक्षा सेवेबाबत विविध स्तरांवर जनजागृती सुरू असल्याचे सांगितले आहे.

