पनवेल : दुचाकींमध्ये अनधिकृत बदल करून मोठ्या आवाजाचे मॉडिफाइड सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनचालकांविरोधात पनवेल शहर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या मोहिमेत जप्त करण्यात आलेले १११ मॉडिफाइड सायलेन्सर विजयादशमीच्या दिवशी रावणाच्या प्रतिकृतीवर बसवून त्यावर बुलडोझर चालवत नागरिकांसमोर नष्ट करण्यात आले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली. पनवेल शहर, नवीन पनवेल आणि पळस्पे परिसरात अनेक दुचाकीस्वारांनी मूळ सायलेन्सरमध्ये अनधिकृत बदल करून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसवल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही मोहीम हाती घेण्यात आली. जानेवारी २०२५ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत १११ मॉडिफाइड सायलेन्सर जप्त करण्यात आले असून, या सायलेन्सरमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मोठ्या आवाजामुळे रुग्णालये, शाळा, निवासी परिसर, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याने दंडात्मक कारवाईबरोबरच सायलेन्सर जप्त करण्याची मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. वनमंत्र्यांच्या कार्यालयाकडून तसेच नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी दिली. यापूर्वी नवी मुंबईतील पामबीच आणि खारघर परिसरातही अशाच प्रकारची मोहीम राबविण्यात आली होती. ध्वनीप्रदूषण करणाऱ्या वाहनांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असून, वाहनचालकांनी स्वतःहून मॉडिफाइड सायलेन्सर काढून टाकावेत, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी दिला आहे.
