ठाणे : ठाणे जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषी विभागामार्फत सन २०२६-२७ या वर्षासाठी पुनर्रचित हवामानावर आधारित आंबा फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. आंबिया बहरामध्ये अवेळी पाऊस, कमी-जास्त तापमान, वेगाचा वारा आणि गारपीट यांसारख्या हवामानातील बदलांमुळे होणाऱ्या नुकसानापासून आर्थिक संरक्षण मिळावे, हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून, ३० नोव्हेंबर २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. ठाणे जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे.
या योजनेत अधिसूचित महसूल मंडळांतील उत्पादनक्षम आंबा फळबागांना विमा संरक्षण दिले जाणार आहे. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी सहभाग ऐच्छिक असून, नोंदणीकृत भाडेकरार असलेले भाडेपट्टाधारक शेतकरीही पात्र असतील. किमान १० गुंठे (०.१० हेक्टर) क्षेत्र आणि कमाल ४ हेक्टरपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. अर्जासोबत जिओ-टॅगिंग असलेला फळबागेचा फोटो अपलोड करणे, ई-पिक पाहणी पूर्ण करणे तसेच आधारशी जोडलेले बँक खाते असणे बंधनकारक आहे. आंबा बागेचे उत्पादनक्षम वय किमान पाच वर्षे असणे आवश्यक असून, चुकीची माहिती दिल्यास विमा संरक्षण रद्द होऊन भरलेला हप्ता जप्त केला जाऊ शकतो. या योजनेअंतर्गत प्रति हेक्टर १ लाख ७० हजार रुपये इतकी विमा संरक्षित रक्कम उपलब्ध असून, शेतकऱ्यांचा विमा हप्ता ८ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर इतका आहे. ठाणे जिल्ह्यात ही योजना भारतीय विमा कंपनी लिमिटेडमार्फत राबविण्यात येत आहे. हवामानातील अनिश्चिततेमुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज दाखल करून विमा संरक्षणाचा लाभ घ्यावा, असे कृषी विभागाने आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा विमा कंपनीशी संपर्क साधण्याचेही सांगण्यात आले आहे.
