मुंबई : महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या दोन दिवसीय आंध्र प्रदेश अभ्यास दौऱ्यात राज्याच्या प्रगत मत्स्यव्यवसाय आणि अॅक्वाकल्चर मॉडेलचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. मत्स्यव्यवसाय क्षेत्रात देशात आघाडीवर असलेल्या आंध्र प्रदेशच्या मत्स्य आयुक्तालयाच्या मुख्यालयाला भेट देऊन तेथील आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादनवाढ, मच्छीमार कल्याण आणि एकात्मिक मत्स्य मूल्यसाखळीची माहिती घेण्यात आली. या बैठकीत सागरी मत्स्यव्यवसाय, अंतर्देशीय मत्स्यव्यवसाय आणि अॅक्वाकल्चर क्षेत्रातील उत्पादकता वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे सादरीकरण करण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित Aquaculture 4.0, मत्स्य आरोग्य आणि रोगनियंत्रण, पाण्याच्या गुणवत्तेचे रिअल-टाइम परीक्षण, स्मार्ट फीडिंग प्रणाली, माशांच्या वर्तनाचे विश्लेषण, RAS आणि Biofloc तंत्रज्ञान, IoT आधारित मत्स्यपालन, डिजिटल ट्रेसेबिलिटी, तलाव नोंदणी, प्रजाती विविधीकरण, मासेमारी नौकांचे ट्रॅकिंग तसेच मासेमारीतील पकडीचे निरीक्षण यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच हॅचरी, मत्स्य खाद्य उत्पादन, प्रयोगशाळा, मत्स्यपालन, प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोरेज, देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यात यांना एकमेकांशी जोडणाऱ्या एकात्मिक मत्स्य मूल्यसाखळीच्या विकास मॉडेलची माहितीही यावेळी देण्यात आली. उत्पादनापासून प्रक्रिया, विपणन आणि निर्यातीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून मत्स्य शेतकरी आणि मच्छीमारांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आंध्र प्रदेशने केलेल्या प्रयत्नांचा महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने अभ्यास केला.
या दौऱ्यादरम्यान समुद्री शेवाळ लागवड, कृत्रिम प्रवाळ भित्तिका, खुल्या समुद्रातील केज कल्चर, हवामान बदलास सक्षम किनारी मच्छीमार गावे तसेच अंतर्देशीय जलस्रोतांचा शास्त्रीय पद्धतीने उपयोग या विषयांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या विस्तीर्ण किनारपट्टीसह अंतर्देशीय जलस्रोतांचा अधिक वैज्ञानिक आणि उत्पादक पद्धतीने वापर करून मत्स्यव्यवसायाला चालना देण्यावर भर दिला. आंध्र प्रदेशातील तंत्रज्ञानाधारित व्यवस्थापन, डेटा-आधारित निर्णयप्रक्रिया आणि संस्थात्मक कार्यपद्धतीतील उपयुक्त बाबींचा अभ्यास करून त्यांची महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यासाठी पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या माध्यमातून राज्यातील मच्छीमार, मत्स्य शेतकरी आणि किनारी भागातील समुदायांसाठी अधिक मूल्यनिर्मिती, रोजगाराच्या संधी आणि उत्पन्नवाढ साध्य करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला आंध्र प्रदेशचे मत्स्य आयुक्त रामा नाईक, अतिरिक्त संचालक डॉ. शंकर राव, महाराष्ट्राचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्य आयुक्त भानुदास पालवे, महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, मत्स्यव्यवसाय तज्ज्ञ मनोज शर्मा, सहआयुक्त महेश देवरे, नागनाथ भादुले तसेच आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत मत्स्यव्यवसाय आणि प्रभावी व्यवस्थापनाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हा अभ्यास दौरा महत्त्वाचा ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

