मुंबई : ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या बहुचर्चित चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार ॲड. उज्ज्वल निकम, अभिनेता राजकुमार राव, मॅडडॉक फिल्म्सचे निर्माते-दिग्दर्शक, पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी तसेच २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी २६/११ हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. तसेच मुंबईच्या सुरक्षेसाठी शौर्याने लढलेल्या वीर पोलिसांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर न्यायालयात अनेक वर्षे चाललेल्या दहशतवादाविरोधातील लढ्याची कहाणी या चित्रपटाच्या माध्यमातून जनतेसमोर येणार आहे. हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नसून समाजाला महत्त्वाचा संदेश देणारा आहे. भारतीय पोलीस दल आणि न्यायव्यवस्थेने अत्यंत संयमाने आणि कायदेशीर मार्गाने जगासमोर भारताची न्यायव्यवस्था मजबूत असल्याचे दाखवून दिले. विशेषतः ॲड. उज्ज्वल निकम यांच्या प्रयत्नांमुळे २६/११ हल्ल्यातील शहीदांना न्याय मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, २६/११च्या रात्री दहशतवाद्यांशी लढताना अनेक जवानांनी दाखवलेले शौर्य देश कधीही विसरणार नाही. या वीरांच्या बलिदानाला योग्य न्याय मिळण्यासाठी त्या हल्ल्यामागील सत्य जगासमोर येणे आवश्यक होते. या चित्रपटाच्या माध्यमातून त्या काळातील घटना आणि न्यायालयीन लढ्याचा प्रवास प्रेक्षकांसमोर मांडला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ हा चित्रपट ॲड. उज्ज्वल निकम यांच्या जीवनप्रवासावर तसेच २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याशी संबंधित न्यायालयीन प्रक्रियेवर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव यांनी ॲड. उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट १६ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
