मुंबई : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील पहिले प्रगत खगोल निरीक्षण केंद्र (Star Gazing Centre) मारळ येथे उभारण्यात येणार आहे. तसेच प्रसिद्ध श्री हरिहरेश्वर मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गाचा विकास आणि सुशोभीकरण करताना आवश्यक पायाभूत सुविधांचा नव्याने आराखडा तयार करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. भारत स्वदेश अंतर्गत हरिहरेश्वर प्रदक्षिणा मार्ग विकास आणि मारळ येथील प्रस्तावित खगोल निरीक्षण केंद्राबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. या बैठकीला पर्यटन संचालनालयाचे अधिकारी, उपअभियंता सोनिया महिंद यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, मारळ परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. समुद्रकिनारे, धार्मिक वारसा, निसर्गसंपदा, ग्रामीण जीवनशैली आणि स्थानिक अर्थव्यवस्था यांचा समन्वय साधून मारळला एकात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर, श्रीवर्धन, दिवेआगर आणि आरावी या पर्यटनस्थळांचा विकास करण्यात येत असून, श्रीवर्धन तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील पर्यटन सुविधा वाढवण्यावर शासनाचा भर आहे. हरिहरेश्वर हे ‘दक्षिण काशी’ म्हणून प्रसिद्ध असून, या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा विचार करून परिसराचा धार्मिक तसेच पर्यटनदृष्ट्या विकास केला जाणार आहे. हरिहरेश्वर मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गासाठी उभारण्यात येणाऱ्या सुविधा अधिक दर्जेदार आणि पर्यटकांच्या गरजा लक्षात घेऊन निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय मारळ येथे उभारण्यात येणाऱ्या प्रगत खगोल निरीक्षण केंद्रासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करावी आणि पर्यटन विभागाकडे सादर करण्यात येणाऱ्या प्रस्तावात सर्व आवश्यक बाबींचा समावेश करावा, असेही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला नवी ओळख मिळण्यास मदत होणार असून, धार्मिक पर्यटनासोबतच खगोल पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

