मुंबई : २,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या यूपीआय व्यवहारांवर ०.४ टक्के शुल्क आकारण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील व्यापारी संघटनांनी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. मध्य प्रदेशातील आंदोलनानंतर आता महाराष्ट्रातही व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी ‘नो यूपीआय डे’ पाळला जाणार आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या माहितीनुसार, या दिवशी राज्यभरातील व्यापारी केवळ रोख व्यवहार स्वीकारणार असून, डिजिटल पेमेंटचा वापर टाळण्यात येणार आहे. या आंदोलनात सुमारे २० हजार व्यापारी सहभागी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे २ ऑक्टोबर रोजी खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या ग्राहकांनी ऑनलाइन पेमेंटवर अवलंबून न राहता रोख रक्कम जवळ बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे आंदोलन २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या देशव्यापी बँक संपानंतर लगेचच होत असल्याने त्याकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. आंदोलनादरम्यान व्यापारी हातावर काळ्या फिती बांधून निषेध नोंदवतील, दुकानांमधील यूपीआय क्यूआर कोड झाकून त्यावर ‘नो यूपीआय डे’ असे फलक लावतील आणि दिवसभर सर्व व्यवहार फक्त रोख स्वरूपात स्वीकारतील. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रवींद्र मानगावे यांनी सांगितले की, ऑनलाइन कंपन्यांच्या वाढत्या स्पर्धेमुळे छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांचा नफा आधीच कमी झाला आहे. अशा परिस्थितीत २,००० रुपयांवरील यूपीआय व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क आकारल्यास त्याचा थेट आर्थिक फटका व्यापाऱ्यांना बसणार आहे. व्यापारी डिजिटल व्यवहारांच्या विरोधात नसून, अतिरिक्त शुल्काचा निर्णय मागे घ्यावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. दरम्यान, केंद्र सरकारने यापूर्वी स्पष्ट केले आहे की, या बदलाचा थेट आर्थिक भार ग्राहकांवर टाकला जाणार नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ग्राहकांना यूपीआयद्वारे व्यवहार करताना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच २,००० रुपयांपर्यंतच्या यूपीआय व्यवहारांवर कोणतेही शुल्क लागू होणार नाही, असेही सरकारने सांगितले आहे. मात्र २,००० रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवरील शुल्काचा भार व्यापाऱ्यांवर येणार असल्याचा दावा व्यापारी संघटनांनी केला असून, त्याच निषेधार्थ राज्यभर हे आंदोलन करण्यात येणार आहे.

