मुंबई : हिंदू संस्कृती, परंपरा आणि सण-उत्सवांना सातत्याने प्रोत्साहन देणाऱ्या नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी १७ सप्टेंबर रोजी गणरायाची विशेष महाआरती आयोजित करावी, असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निरोगी, दीर्घायुष्यासाठी ही महाआरती आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समितीने गणेश मंडळांना महाआरतीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून पंतप्रधानांना शुभेच्छा देण्याचेही आवाहन केले आहे. देशभरात पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, त्याच काळात महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असेल. समितीच्या मते, गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने हिंदू धर्म, संस्कृती आणि धार्मिक स्थळांच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. अयोध्येतील राम मंदिराची उभारणी, विविध तीर्थक्षेत्रांचा विकास तसेच हिंदू परंपरांना चालना देण्यासाठी घेतलेल्या उपक्रमांमुळे देशात आणि परदेशात भारतीय संस्कृतीचा गौरव वाढल्याचे समितीने नमूद केले आहे.
महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हिंदू संस्कृती आणि सण-उत्सवांशी संबंधित अनेक निर्णय घेण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकारातून राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याबद्दल समितीने यापूर्वीच राज्य शासनाचे अभिनंदन केले असल्याचेही सांगण्यात आले. या उपक्रमाला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट महाआरती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी प्रथम पारितोषिक ५१ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक ३१ हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक २१ हजार रुपये ठेवण्यात आले आहे. तसेच घरगुती गणेशोत्सवासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रथम पारितोषिक ५ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक ३ हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक २ हजार रुपये देण्यात येणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक गणेश मंडळांनी सहभागी होऊन भक्ती, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश द्यावा, असे आवाहन समन्वय समितीने केले आहे.

