ठाणे : गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्राने जागतिक स्तरावर अभिमानास्पद कामगिरी नोंदवली आहे. ठाण्यातील वाशी येथील सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित ‘पर्यावरणपूरक महा गणेशमूर्ती कार्यशाळा २०२६’मध्ये तब्बल १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी एकाच वेळी शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडवत ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये महाराष्ट्राच्या नावाची नोंद केली. या ऐतिहासिक उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, वनमंत्री गणेश नाईक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. निकाल जाहीर होताच उपस्थितांनी जल्लोष करत विद्यार्थ्यांच्या या विक्रमी कामगिरीचे कौतुक केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या यशाचे खरे शिलेदार विद्यार्थी असल्याचे सांगत त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी गणेशोत्सव हा केवळ श्रद्धेचा नव्हे तर पर्यावरण संवर्धनाचाही संदेश देणारा सण असल्याचे नमूद केले. आपल्या संस्कृतीत पंचमहाभूतांचे संरक्षण महत्त्वाचे असून, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणि रासायनिक रंगांमुळे जलस्रोतांचे नुकसान होत असल्याची जाणीव करून देत त्यांनी शाडूच्या मातीच्या पर्यावरणपूरक मूर्तींचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. “मूर्ती मोठी की लहान यापेक्षा भक्ती मोठी असते. देवाचा आशीर्वाद मूर्तीच्या आकारावर नव्हे, तर पर्यावरण आणि समाजासाठी आपण काय योगदान देतो यावर ठरतो,” असे ते म्हणाले.
या कार्यशाळेतील सर्वात आकर्षक क्षण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः शाडूची माती हातात घेऊन गणेशमूर्ती साकारली. राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वाने प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, “शाडूच्या मातीपासून बाप्पा घडवणारे हे विद्यार्थी खऱ्या अर्थाने ‘वसुंधरा रक्षक’ आहेत. संस्कृती जपत पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे हेच या मोहिमेचे उद्दिष्ट आहे,” असे सांगितले. ढोल-ताशांच्या गजरात, मूर्तिकारांच्या मार्गदर्शनाखाली आणि हजारो विद्यार्थी, प्राध्यापक, कलाकार व गणेशभक्तांच्या उपस्थितीत संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. या विक्रमी उपक्रमामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना अधिक बळकट झाली असून, राज्यभरातील नागरिकांना शाडूच्या मातीच्या मूर्तींचा स्वीकार करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. महाराष्ट्राने पर्यावरण संवर्धन आणि सांस्कृतिक परंपरा यांचा सुंदर संगम घडवत जागतिक स्तरावर नवा आदर्श निर्माण केला असून, भविष्यातही अशा उपक्रमांमधून पर्यावरण रक्षणाची जनजागृती अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

