मुंबई : राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीबाबत काही माध्यमांमध्ये चुकीचे दावे करण्यात आल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. काही वृत्तांमध्ये प्रारूप मतदार यादीतील मतदारसंख्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मतदान केलेल्या मतदारांपेक्षा कमी असल्याचे म्हटले गेले. मात्र, ही तुलना दिशाभूल करणारी असून सध्याच्या टप्प्यातील यादी ही अंतिम नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. विशेष सखोल पुनरीक्षणाच्या पहिल्या टप्प्यात अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर संबंधित मतदार प्रत्यक्षात वास्तव्यास आहे की नाही, याची पडताळणी करण्यात आली. त्यामुळे दिलेल्या पत्त्यावर वास्तव्यास नसलेले किंवा इतरत्र स्थलांतरित झालेले मतदार तात्पुरते प्रारूप यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाहीत. तसेच, मृत मतदारांची नावेही यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे प्रारूप यादीतील आकडेवारी आणि पूर्वीच्या अंतिम मतदार यादीची थेट तुलना करणे योग्य नसल्याचे आयोगाने नमूद केले आहे.
सध्या सुरू असलेल्या दुसऱ्या टप्प्यात स्थलांतरित मतदार, नव्याने पात्र ठरलेले मतदार तसेच विविध कारणांमुळे पहिल्या टप्प्यात नाव नोंदवू न शकलेले नागरिक यांना पुन्हा अर्ज करण्याची संधी दिली जात आहे. १ ऑक्टोबर २०२४ नंतर १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांची नोंदणीही याच टप्प्यात सुरू असून, राज्याच्या हद्दीत नवीन पत्त्यावर वास्तव्यास असलेले मतदारही आपल्या सध्याच्या पत्त्यावर नाव नोंदवू शकतात. कोणताही पात्र नागरिक मतदार यादीपासून वंचित राहू नये, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. संपूर्ण विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम नोव्हेंबरच्या सुरुवातीला पूर्ण होणार असून त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे अंतिम यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी कोणतीही तुलना, विश्लेषण किंवा निष्कर्ष काढू नयेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे. प्रसारमाध्यमे, राजकीय पक्ष आणि नागरिकांनी अधिकृत अंतिम आकडेवारीची प्रतीक्षा करूनच मतदारसंख्येबाबत भाष्य करावे, अन्यथा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

