पुणे : देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय सैनिकांच्या मनगटावर पुणेकरांच्या प्रेमाची राखी बांधून यंदाचा रक्षाबंधन सण अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. ‘श्री पांडुरंग आदर्श सेवा ट्रस्ट’ आणि ‘आम्ही पुणेकर’ संस्थेच्या संयुक्त पुढाकारातून जम्मू-काश्मीरमधील पुंछ, केरन आणि उरी या संवेदनशील सीमाभागांमध्ये तैनात असलेल्या जवानांना राख्या बांधण्यात आल्या. पुणे शहरातील नागरिक, महिला, विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत सुमारे सात ते आठ हजार राख्या संकलित केल्या. या राख्या ‘आम्ही पुणेकर’ संस्थेच्या माध्यमातून सीमेवर पोहोचवून सैनिकांच्या मनगटावर बांधण्यात आल्या. यावेळी सैनिकांना मिठाई देत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. हा उपक्रम केवळ सण साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता देशाच्या सुरक्षेसाठी आपले कुटुंब, सण-उत्सव आणि वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून सीमेवर उभ्या असलेल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा ठरला. त्यामुळे सैनिक आणि नागरिक यांच्यातील भावनिक बंध अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या उपक्रमामागील प्रमुख उद्देश म्हणजे रक्षाबंधन हा सण केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित न ठेवता देशरक्षणासाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या प्रत्येक सैनिकाशी भावनिक नातं जोडणारा उत्सव म्हणून साजरा करणे हा होता. ‘आम्ही पुणेकर’ संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबवत असून, यंदाही त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. सीमेवर कुटुंबापासून दूर राहून कठीण परिस्थितीत देशाच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडणाऱ्या जवानांच्या मनगटावर राखी बांधताना उपस्थितांनी त्यांच्या शौर्याला सलाम केला. सैनिकांनीही या प्रेमळ उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत नागरिकांच्या शुभेच्छा आणि विश्वास हेच आपल्यासाठी सर्वात मोठे बळ असल्याची भावना व्यक्त केली. देशवासीयांच्या सुरक्षिततेसाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करणाऱ्या सैनिकांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणारा हा क्षण उपस्थितांसाठी अत्यंत भावूक आणि अविस्मरणीय ठरला. राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि सैनिकांप्रती असलेला सन्मान यांचे सुंदर दर्शन घडवणारा हा रक्षाबंधन सोहळा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.

