रत्नागिरी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूण शहर भारतीय जनता पक्षाच्या मंडळातर्फे अपरांत हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. समाजोपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिक आणि रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध वयोगटातील नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक सक्षम नागरिकाने नियमित रक्तदान करण्याचे आवाहन केले. भाजप रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी आपल्या मनोगतात रक्तदानाचे सामाजिक महत्त्व स्पष्ट करत, रक्ताला कोणतीही जात, धर्म किंवा भाषा नसते, असे सांगितले. गरजू व्यक्ती कोणत्याही समाजातील असो, त्याला आवश्यक त्या रक्तगटाचे रक्त मिळणे हीच खरी मानवतेची सेवा असल्याचे त्यांनी नमूद केले. रक्तदानामुळे समाजात माणुसकी, बंधुभाव आणि सामाजिक एकतेचा संदेश पोहोचतो. रक्तदान हीच खरी समाजसेवा आणि देशभक्ती असल्याचे सांगत त्यांनी प्रत्येक सक्षम नागरिकाने वर्षातून किमान दोन वेळा स्वेच्छेने रक्तदान करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. रक्तदानाबाबत असलेली भीती आणि गैरसमज दूर करून अधिकाधिक लोकांनी या चळवळीत सहभागी व्हावे, कारण एका व्यक्तीने दिलेला रक्ताचा एक थेंबही दुसऱ्या एखाद्या रुग्णासाठी जीवनदायी ठरू शकतो, असेही त्यांनी सांगितले. या शिबिराच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव निर्माण करण्यासह रक्तसाठा वाढविण्याचा महत्त्वाचा संदेश देण्यात आला.
या रक्तदान शिबिराला आमदार प्रमोद जठार यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये भाजप रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे आणि सुप्रिया उत्तेकर, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत शहा, उपनगराध्यक्षा रुपाली दांडेकर, जिल्हा चिटणीस योगेश शिर्के, शहर मंडळ अध्यक्ष शशिकांत मोदी, ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्षा आदिती गुडेकर, शहर सरचिटणीस सारिका भावे, आरोग्य सभापती शुभम पिसे, नगरसेवक संदीप भिसे, नगरसेविका अंजली कदम आणि शीतल रानडे, सहकार सेल जिल्हाध्यक्ष रत्नदीप देवळेकर, चिपळूण ग्रामीण प्रभारी रामदास राणे, युवा मोर्चा सरचिटणीस कुणाल आंबेकर यांच्यासह महेश दीक्षित, इम्तियाज कडू, संजय शेरे, नरेंद्र बेलवलकर, विलास चव्हाण, रुही खेडेकर, सपना भिसे, माधुरी शिंदे, श्रुती जोशी, पूजा कदम, ज्योती देसाई, विभावरी जाधव तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांचे मान्यवरांनी कौतुक करत समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले. अशा सामाजिक उपक्रमांमुळे गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होण्यास मदत होते आणि समाजात स्वेच्छा रक्तदानाबाबत सकारात्मक जनजागृती निर्माण होते, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

