ठाणे : ठाणे जिल्ह्यात गुरुवारी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने भारतीय हवामान विभागाने नारिंगी इशारा जारी केला असला, तरी सकाळच्या सत्रातील शाळा नियमितपणे सुरू राहिल्या. जिल्हा प्रशासनाने परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक स्तरावर दिले असले, तरी सकाळपर्यंत जिल्हाभरात कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे विद्यार्थी नेहमीप्रमाणे रेनकोट, छत्र्या आणि शालेय बसच्या सहाय्याने शाळांकडे रवाना झाले. अनेक पालकांनी स्वतः मुलांना शाळेत पोहोचविले. सकाळपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कमी-अधिक होत असला, तरी संततधार सुरू असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने १ जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार ठाणे जिल्ह्यासाठी १ ते ३ जुलै या कालावधीत नारिंगी इशारा, ४ जुलै रोजी लाल इशारा आणि ५ जुलै रोजी पुन्हा नारिंगी इशारा देण्यात आला आहे. या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, काही भागांत पाणी साचणे, पूरस्थिती निर्माण होणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तसेच शाळा व्यवस्थापनांनी स्थानिक हवामानाचा आणि परिसरातील परिस्थितीचा सातत्याने आढावा घेऊन विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यास संबंधित शिक्षण विभाग, स्थानिक प्रशासन, महसूल विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी समन्वय साधून शाळा सुरू ठेवायची की बंद ठेवायची, याचा निर्णय स्थानिक स्तरावर तातडीने घेता येईल. तसेच घेतलेल्या निर्णयाची माहिती शिक्षण विभाग, पालक आणि स्थानिक प्रशासनाला त्वरित देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, ठाणे शहरात काही भागांत पावसाचा जोर वाढल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून काही शाळांनी पूर्वप्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना गुरुवारी सुट्टी जाहीर केली. मुसळधार पावसामुळे लहान मुलांना शाळेत ये-जा करताना होणारा संभाव्य त्रास, वाहतुकीतील अडचणी आणि गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे चिमुकल्यांचे पावसातील हाल टळले. जिल्ह्यातील इतर शाळांमध्ये मात्र नियमित अध्यापन सुरू असल्याचे चित्र दिसून आले. हवामानातील बदल लक्षात घेऊन प्रशासनाने परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले असून आवश्यकतेनुसार पुढील निर्णय स्थानिक परिस्थितीनुसार घेतले जातील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

