ठाणे : उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच पाणीटंचाईच्या समस्यांना सामोरे जाणाऱ्या ठाणेकरांच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मार्फत करण्यात येणाऱ्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे ठाणे शहरातील अनेक भागांमध्ये तब्बल २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ठाणे महानगरपालिकेने याबाबत अधिकृत माहिती देत नागरिकांना आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे. गुरुवार, ७ मे २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून ते शुक्रवार, ८ मे २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत हा शटडाऊन लागू राहणार आहे. जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशय (HSR) येथे बारवी गुरुत्ववाहिनी क्रमांक १, २ आणि ३ वर उन्नतीकरण तसेच तातडीच्या देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्यामुळे पाणीपुरवठा खंडित होणार आहे. या कालावधीत दिवा, कळवा आणि मुंब्रा प्रभाग समितीतील बहुतांश भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. मात्र, मुंब्रा प्रभागातील प्रभाग क्रमांक २६ आणि ३१ मधील काही भागांना यामधून सूट देण्यात आली आहे.
याशिवाय वागळे प्रभाग समितीतील रुपादेवी पाडा, किसननगर क्रमांक २, नेहरूनगर तसेच मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत कोलशेत खालचा गाव या परिसरांमध्येही २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दरम्यान, शटडाऊन संपल्यानंतर लगेचच परिस्थिती पूर्ववत होणार नसून पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. आधीच सुरू असलेल्या पाणीकपातीमुळे ठाणेकर त्रस्त असताना आता वारंवार होणाऱ्या शटडाऊनमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ठाणे महानगरपालिकेने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले असून, आवश्यक तेवढाच पाणीसाठा करून प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती केली आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

