मुंबई : राजा शिवाजी या बहुचर्चित चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर १ मे २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर सुमारे १२.४० कोटी रुपयांची कमाई केली आहे. यापैकी केवळ मराठी आवृत्तीची कमाई जवळपास ८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून, कोणत्याही मराठी चित्रपटासाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग मानली जात आहे. हिंदी आवृत्तीलाही चांगला प्रतिसाद मिळत असून तिने ३.३५ कोटींहून अधिक व्यवसाय केला आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथील अनेक चित्रपटगृहांबाहेर ‘हाऊसफुल्ल’चे फलक झळकले, तर थिएटरमधील प्रेक्षकांची सरासरी उपस्थिती ६८ टक्क्यांहून अधिक नोंदवली गेली.
यापूर्वी पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाईचा विक्रम सैराट आणि टाइमपास २ यांच्या नावावर होता. मात्र ‘राजा शिवाजी’ने या चित्रपटांच्या तुलनेत जवळपास दुप्पट कमाई करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. सुमारे १०० कोटी रुपयांच्या भव्य बजेटमध्ये तयार झालेला हा आतापर्यंतचा सर्वात महागडा मराठी चित्रपट मानला जात आहे. जेनेलिया देशमुख यांनी सईबाईंची भूमिका साकारली असून, संजय दत्त, अभिषेक बच्चन आणि सलमान खान यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका चित्रपटात आहेत. विशेष म्हणजे रितेश आणि जेनेलिया यांच्या मुलांनीही चित्रपटात बालशिवाजींची भूमिका साकारली आहे. पहिल्या दिवसाच्या यशानंतर रितेश देशमुख यांनी हा चित्रपट महाराजांना वाहिलेली मानवंदना असल्याचे सांगत प्रेक्षकांचे आभार मानले. शनिवार-रविवारच्या सुट्ट्या आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळे येत्या काही दिवसांत चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
