मुंबई : महाराष्ट्र पोलिस दलातील ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. महाराष्ट्र गृह विभाग यांनी नुकतीच १८९ अधिकाऱ्यांची यादी प्रसिद्ध करत संबंधित युनिट प्रमुखांना पदोन्नतीची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या अधिकाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या जबाबदाऱ्यांमधून कार्यमुक्त करून नवीन पदांवर नियुक्त करण्यास सांगण्यात आले आहे. काही काळापासून ही प्रक्रिया कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणींमध्ये अडकली होती. गृह विभागाने यापूर्वी आदेश क्रमांक ०२ द्वारे पदोन्नतींना मंजुरी दिली होती, मात्र मुंबईतील एमएमपी न्यायाधिकरणासमोर प्रलंबित असलेल्या अर्जामुळे आणि सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशांमुळे या प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती.
दरम्यान, सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद काका वायंदे आणि शिवशंकर रमेश भोसले यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट याचिकेच्या सुनावणीनंतर परिस्थितीत बदल झाला. २९ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या न्यायालयीन घडामोडींनंतर सरकारने पदोन्नती प्रक्रियेला हिरवा कंदील दिला. त्यामुळे आता कोणताही विलंब न करता अधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाणार आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने सरकारने मोठा प्रशासकीय फेरबदलही केला आहे. गृह मंत्रालयाने २१ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर केली असून, मुंबई पोलिस दलात चार नवीन पोलीस उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांमध्ये अनुभवी आणि तरुण अधिकाऱ्यांचा समतोल राखण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

