पुणे : उन्हाळी सुट्टीत मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देत वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी शहरात ३० एप्रिलपासून ‘पुणे बाल पुस्तक जत्रा’ भरविण्यात येणार आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे ४ मेपर्यंत चालणाऱ्या या जत्रेत पुस्तक प्रदर्शनासोबतच विज्ञान विषयक संवाद, Artificial Intelligence (एआय) मार्गदर्शन आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. Pune Municipal Corporation, पुणे पुस्तक महोत्सव, समर्थ युवा फाऊंडेशन आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जात आहे. जत्रेच्या उद्घाटनासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार असून, सहभागी होणाऱ्या प्रत्येक मुलाला खाऊ आणि पुस्तक भेट देण्याचीही योजना आहे.
या जत्रेत १०० हून अधिक पुस्तक स्टॉल्स उभारले जाणार असून लहान मुलांसाठी विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. मुलांना मोबाईल आणि टीव्हीपासून दूर ठेवून वाचनाकडे आकर्षित करण्याचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. याशिवाय गीतरामायण सादरीकरण, पपेट शो, जादूचे प्रयोग, साहसी व पारंपरिक खेळ, मुलांचे कविसंमेलन आणि लेखकांशी प्रत्यक्ष संवाद अशा अनेक उपक्रमांची रेलचेल असणार आहे. सुमारे एक लाख मुलांचा सहभाग अपेक्षित असून, उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी विशेष व्यवस्था केली जाणार आहे. ही जत्रा मुलांसाठी ज्ञान, संस्कार आणि मनोरंजनाचा संगम ठरणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
