वृत्तसंस्था : बहुप्रतिक्षित ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटाबाबत चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी समोर आली आहे. अभिनेता अक्षय कुमार यांनी स्वतः या प्रकल्पाबाबत माहिती देताना सध्या तरी चित्रपटाचे काम पूर्णपणे थांबले असल्याचे स्पष्ट केले आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, सध्या ‘हेरा फेरी ३’ची निर्मिती सुरू होणार नसून किमान पुढील एक वर्ष तरी या प्रकल्पात कोणतीही हालचाल होण्याची शक्यता कमी आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता असतानाही विविध अडचणींमुळे तो पुढे सरकू शकलेला नाही.
या विलंबामागे मुख्यतः चित्रपटाच्या हक्कांशी संबंधित कायदेशीर वाद आणि प्रॉडक्शनशी निगडित करारांमधील अडथळे कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. मात्र, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्यासोबत कोणताही वाद नसल्याचे अक्षय कुमार यांनी स्पष्ट केले आहे. हे तिघे कलाकार Welcome to the Jungle या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. ‘हेरा फेरी ३’ रखडल्यामुळे स्वतःलाही वाईट वाटत असल्याचे सांगत अक्षय कुमार यांनी विनोदी शैलीत प्रतिक्रिया देताना, चित्रपट लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. त्यामुळे ‘राजू-श्याम-बाबुराव’ ही लोकप्रिय जोडी पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
