ठाणे : शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे हे कार्यकर्त्यांचे पाठबळ होते. परंतु मला आठवतय की, त्यांचा फोटो लावायची काय गरज आहे, असे बोलले जायचे. त्यांचा फोटोचा आकार लहान-मोठा यावरूनही बोलले जायचे. त्यामुळे दिघे यांच्या फोटोवर बोलणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टिपटाॅप प्लाझा येथे शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या वतीने प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री असताना प्रदूषण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली, त्यावेळी काही जणांनी हे मुख्यमंत्र्यांचे काम आहे का, असा सवाल केला होता. मात्र, मुख्यमंत्र्याचे काम काय असते हे मी त्यावेळी दाखवून दिले. प्रदूषण कमी करण्यासाठी आम्ही रस्ते धुण्याचे काम केले, परंतु टिका करणाऱ्यांनी मुंबई महानगर पालिका धुऊन खाल्ली. त्यांनी काय काय खाल्लं, मला माहित आहे, त्याबद्दल तुम्हाला काय काय सांगायचं, आता मी बोलत नाही, ते मुंबईच्या भाषणामध्ये बोलणार आहे, असे शिंदे म्हणाले.

