वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशातून धक्कदायक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील झाशी येथे एका तरुणाचा क्रिकेट खेळताना मैदानावरच मृत्यू झाला. धक्कदायक म्हणजे या तरुणाने बॉलिंग केल्यानंतर पाणी प्यायल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचं म्हटलं जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तरुणाच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव रवींद्र अहिरवार (३० वर्षे) असे आहे. रवींद्र झाशी येथील एलआयसीमध्ये विकास अधिकारी म्हणून काम करत होता. रवींद्र पूर्णपणे निरोगी होता आणि नेहमीप्रमाणे सकाळी उठला आणि त्याच्या वडिलांसोबत चहा प्यायला. त्यानंतर सिप्री बाजार पोलिस स्टेशन परिसरातील जीआयसी मैदानावर रवींद्र क्रिकेट खेळण्यासाठी गेला. क्रिकेट मॅच दरम्यान रवींद्रकडे बॉलिंगची जबाबदारी होती. रवींद्रच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार, त्याची बॉलिंग झाल्यांनतर त्याला तहान लागली. तहान लागली म्हणू तो पाणी प्यायला. पाणी पिल्यानंतर त्याला अचानक उलट्या झाल्या आणि तो बेशुद्ध पडला. त्याच्या मित्रांनी त्याला ताबडतोब झाशी मेडिकल कॉलेजमध्ये नेले, जिथे तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

