मुंबई : राज्यातील कॅब, टॅक्सी, रिक्षाचालकांच्या प्रलंबित मागण्या व त्यांच्या अडचणी सरकारने सोडवाव्यात यासाठी ऐन दिवाळीच्या तोंडावर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय भारतीय गिग कामगार मंचने घेतला आहे. परिवहन विभागाकडून मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मंचाचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी केला आहे. अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर म्हणाले, कॅब ॲग्रिगेटर कंपन्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या नवीन नियमांवर चालकांचा आक्षेप आहे. सरकारने नियम हे सुरक्षिततेसाठी केले असले तरी चालकांच्या उपजीविकेला ते धोका पोहोचवणारे आहेत. तसेच वाहनचालकांसाठी अनेक अडचणी निर्माण करणाऱ्या आहेत.
पारंपरिक टॅक्सीप्रमाणे ॲपआधारित कॅबवर सुद्धा वेटिंग चार्जेसचे नियम असावेत, रेटिंग प्रणा-लीच्या माध्यमातून पूर्वसूचना आणि शहानिशा न करता चालकांचे अकाउंट बंद करणे अन्यायकारक आहे. सरकारने कामाचे तास मर्यादित केल्यास उत्पन्न घटेल, अशा स्थितीत कंपन्यांनी किमान वेतनाची हमी देऊन उत्पन्नाचा फरक भरून द्यावा, चालकांना प्रवासाचे ठिकाण माहिती नसेल तर ट्रिप रद्द होण्याचे प्रमाण वाढेल. यामुळे चालक व प्रवाशांना दोघांनाही त्रास होईल. प्रवास ठिकाणाची माहिती दृश्यमान ठेवावी, कंपन्यांनी नियम पाळले नाहीत तर दंड व शिक्षा याबाबत स्पष्ट उल्लेख असावा, अशी चालकांची मते आहेत. कंपन्यांनी नियम पाळले नाहीत तर दंडात्मक कारवाई व शिक्षा ठरवावी, स्वतंत्र व पारदर्शक तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करावी, बेकायदेशीर काम करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई व्हावी, ॲल्गोरिदम पारदर्शकता व स्वतंत्र चालकांसोबत होणारा भेदभाव थांबवावा आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत. याचबरोबर सध्या मोठ्या प्रमाणावर बाईक टॅक्सी, खासगी कार पुलिंग व एग्रिगेटर बसेस सुरू झाल्या आहेत. ज्यामुळे रिक्षा व कॅबचालकांच्या व्यवसायावर संकट आले आहे. राज्यातील वाहने मर्यादित न केल्यास वाहतूक कोंडीचे मोठे संकट निर्माण होईल. ओला, उबर, रॅपिडो या कंपन्या सध्या कोण-तेही नियम पाळत नाहीत. त्यामुळे नवीन नियम प्रत्यक्षात केव्हा लागू होतील. यावर संशय आहे. तत्पूर्वी; शासनमान्य दराची सक्ती करणे आवश्यक आहे. चालकांच्या मागण्या व अडचणी सोडवाव्या यासाठी दिवाळीच्या तोंडावर चक्काजाम करण्यात येईल. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या मोठ्या शहरांमध्ये या चक्काजाम आंदोलनाचा सर्वाधिक परिणाम होईल.