मुंबई : अभिनेता सुनील शेट्टी याने त्याच्या व्यक्तिमत्त्व हक्क संरक्षणाच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अनेक संकेतस्थळ आणि समाजमाध्यमे त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी बेकायदेशीररीत्या आपल्या छायाचित्रांचा वापर करत असल्याचा आरोप शेट्टी याने केला आहे. तसेच, अशा सर्व संकेतस्थळांना आपली छायाचित्रे ताबडतोब हटवण्याचे आदेश देण्याची अंतरिम मागणी केली आहे. या संकेतस्थळ आणि समाजमाध्यमांना आपली छायाचित्रे वापरण्यापासूनही प्रतिबंध करावा, अशी मागणीही शेट्टी याने न्यायालयाकडे केली आहे. न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठापुढे या प्रकरणी शुक्रवारी सुनावणी झाली. त्यावेळी, थोडक्यात युक्तिवाद ऐकल्यानंतर एकलपीठाने शेट्टी याच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला.
सुनील शेट्टी आणि त्यांच्या नातीच्या बनावट प्रतिमा काही संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यांच्या परवानगीशिवाय अनेक संकेतस्थळ आणि समाजमाध्यमांकडून त्यांचा व्यावसायिक फायद्यासाठी वापर केला जात असल्याचे शेट्टी यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. एका रिअल इस्टेट कंपनीच्या आणि एका जुगाराच्या संकेतस्थळानेही शेट्टी यांचे छायाचित्र वापरले असून तेही विनापरवाना होते, असा दावाही शेट्टी याच्या वतीने करण्यात आला. आपल्या व्यक्तिमत्त्वावर आणि छायाचित्रांवर केवळ आपला अधिकार आहे आणि ते अधिकाराशिवाय प्रसारित केल्याने त्याची प्रतिष्ठा मलीन होत आहे, असेही शेट्टी याने याचिकेत म्हटले आहे.