डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील रामनगरमधील वाहतूक पोलीस कार्यालया समोरील एका रुग्णालयात लाकडी खोक्यात बंदिस्त ठेवण्यात आलेली चार लाख रूपये किमतीची सोनोग्राफीची मशिन अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. यासंदर्भात एका डॉक्टरने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. ३० सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत हा चोरीचा प्रकार डोंबिवली पूर्वेतील वाहतूक पोलीस कार्यालया समोरील सुमती निवासच्या पहिल्या माळ्यावरील कक्षात घडली आहे. या चोरीप्रकरणी डॉ. प्रीतिश श्रीकांत भावसार यांनी रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुध्द तक्रार केली आहे. दिवसाढवळ्या दुपारी साडे तीन वाजण्याच्या दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला आहे.
डॉ. प्रीतिश भावसार यांनी रामनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की सुमती निवासमधील पहिल्या माळ्यावरील एका कक्षात रुग्ण तपासणीची चार लाख रूपये किमतीची सोनोग्राफी मशिन एका लाखडी खोक्यात बंदिस्त करून ठेवली होती. मे. होन्डा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीची ही करड्या रंगाची सोनोग्राफी मशिन आहे. सोनोग्राफी मशिन ठेवलेल्या खोलीचा मुख्य दरवाजा कुलुपू लावून बंदिस्त होता. तरीही अज्ञात इसमाने दरवाजाचे कुलूप तोडून दिवसाढवळ्या खोलीत प्रवेश केला. आणि कोणालाही सुगावा लागणार नाही अशा पध्दतीने ही मशिन चोरून नेली आहे.