ठाणे : मुंबईजवळी कल्याणमधील एका प्रसिद्ध शाळेने काढलेल्या फतव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. या शाळेने विद्यार्थ्यांना कपाळावर टिळा, टिकली तर हाताला राखी, धागा किंवा बांगड्या घालू नये असा फतवा काढला आहे. एवढंच नाही तर या नियमाचे उल्लंघन केल्यास शिक्षा देण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. त्यामुळे या अजब फतव्यानंतर पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे. या अजब फतवा कल्याणमधील श्रीमती कांताबाई चंदुलाल गांधी इंग्लिश स्कूल या प्रसिद्ध शाळेने काढला आहे. या फतव्यानंतर पालकांनी शाळेविरोधात शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पालकांनी शाळेच्या अजब फतव्याविरोधात नाराजी दर्शविण्यासाठी शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची शिक्षण विभागाने दखल घेत शाळेला नोटीस बजावली असून शाळेवर कारवाई करण्याचे आश्वासन दिलं आहे. तक्रारी नंतर केडीएमसीने शाळेला नोटीस बजावली असून या प्रकरणाबद्दल खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. शाळेने मुलांना त्यांना कपाळावर टिका, हातात राखी किंबा धागा घालण्यास मनाई केली आहे. तर मुलींना बांगड्या आणि कपाळावर टिकली लावण्यास बंदी लावली आहे. जर या नियमाचे उल्लंघन केल्यास विद्यार्थ्यांना शिक्षा करण्यात येईल असं पालकांना बजावलं आहे. त्यामुळे संतप्त पालकांनी या निर्णयाविरोधातठाकरे गटाचे कल्याण विधानसभा संघटक रुपेश भोईर यांना गाठून शाळेविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर रुपेश भोईर यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका शिक्षण विभागाकडे हे प्रकरण लावून धरलं आहे. कल्याण डोंबिवली मनपा शिक्षण विभागाने या घटनेची तातडीने दखल घेत शाळेला नोटीस पाठवून तातडीने खुलासा देण्याचे आदेश दिले आहेत. तर काही पालकांनी उबाठा गटाकडे या प्रकरणासंबंधी तक्रार केल्यानंतर त्यांनीही शिक्षण विभागाला पत्रव्यवहार करुन प्रकरणाची चौकशी करण्याबद्दल विनंती केली आहे.

