ठाणे : बुलेट ट्रेन हा भारतातील सर्वात महत्वकांक्षी प्रकल्प आहे. भारतातील पहिला ५०८ किमी लांबीचा बुलेट ट्रेन कॉरिडॉर मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान बांधला जात आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या चाचण्या २०२६ मध्ये सुरू होणार आहेत. बुलेट ट्रेनचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. बुलेट ट्रेन प्रोजेक्टमुळे महाराष्ट्रातील ठाणे स्टेशनला वेगळी ओळख मिळणार आहे. ठाणे स्टेशन बुलेट ट्रेन, रेलवे, मेट्रो, रस्ते, जलमार्ग आणि थेट विमानतळाला जोडणारे भारतातील एकमेव स्टेशन ठरणार आहे. ठाण्यात भारतातील सर्वात दर्जाच्या वाहतूक सुविधा निर्माण केल्या जात आहेत.
मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्पात एकूण १२ स्थानके आहेत. त्यापैकी चार मुंबई, ठाणे, विरार आणि बोईसर महाराष्ट्रात आहेत. या स्थानक क्षेत्रांचा नियोजित विकास प्रस्तावित आहे. भारत सरकार, जपान सरकार आणि राज्य सरकार यांच्यात एक सामंजस्य करार झाला आहे. ठाणे आणि विरार स्थानक क्षेत्रांसाठी नियोजित विकास आराखडे स्थानिक नगरपालिका, जपान सरकारचे प्रतिनिधी, जेआयसीए आणि नगरविकास विभाग संयुक्तपणे तयार करत आहेत. नियोजन प्रक्रियेत सर्व भागधारकांना सहभागी करून घेण्यासाठी आणि त्यांच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी हा चर्चासत्र आयोजित करण्यात आला होता. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या नेतृत्वाखालील नगरविकास विभागाने केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालय, रेल्वे मंत्रालय आणि राष्ट्रीय हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसंवादाचे संयोजन केले. केंद्र सरकारच्या नगररचना संघटना, जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था (JICA), नगररचना आणि मूल्यांकन विभाग, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार महानगरपालिका तसेच बांधकाम व्यावसायिक, वास्तुविशारद आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
हाय-स्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पामुळे आर्थिक गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढतील. ठाणे स्टेशन बुलेट ट्रेन, रेल्वे, मेट्रो, अंतर्गत मेट्रो, बस, जेट्टी (जलमार्ग), कॅब-रिक्षा स्टेशन तसेच जवळील सर्व प्रमुख महामार्ग आणि विमानतळांना समर्पित रस्त्यांद्वारे जोडले जाईल. ठाणे सर्व वाहतूक सुविधांसाठी एक जंक्शन बनेल. राज्यातील हाय-स्पीड रेल्वे स्टेशन क्षेत्राच्या विकासात सर्व भागधारकांनी सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. ज्यामध्ये शहराचे आमूलाग्र रूपांतर करण्याची क्षमता आहे. या संदर्भात, स्टेशन क्षेत्राच्या विकासाची दिशा निश्चित करण्यासाठी ठाण्यात केंद्र सरकार, राज्य सरकार, गुजरात सरकार, जपान सरकार, स्थानिक नगरपालिका आणि संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींसह आंतरराष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला. हाय-स्पीड रेल्वे स्टेशन परिसराच्या नियोजित विकासामुळे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होईल आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. या मार्गावर ठाण्यातील स्टेशन क्षेत्र विकसित करताना, २५ टक्क्यांहून अधिक क्षेत्र हिरव्या जागांसाठी राखीव ठेवले जाईल. ठाणे हाय-स्पीड स्टेशन हे भारतातील पहिले मल्टीमॉडल इंटिग्रेटेड स्टेशन असेल. ते बुलेट ट्रेन, रेल्वे, मेट्रो, इनर मेट्रो, बस स्टेशन, जेट्टी (जलमार्ग), कॅब-रिक्षा स्टेशन तसेच जवळील सर्व प्रमुख महामार्ग आणि समर्पित रस्त्यांद्वारे विमानतळाशी जोडले जाईल. सर्व सार्वजनिक वाहतूक सुविधा सर्वसामान्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध असतील. आयुक्त राव यांनी स्पष्ट केले की, या सर्व सुविधा अतिशय नियोजनबद्ध आणि पूरक पद्धतीने एकमेकांशी जोडल्या जातील. हाय-स्पीड रेल्वे स्टेशन क्षेत्राच्या विकासासाठी धोरणात्मक विकास सुरू आहे. या चर्चासत्राचे विषय, आव्हाने आणि संधी यावर विचारमंथन करण्यासाठी हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. चर्चासत्राचे स्वरूप स्पष्ट करताना, अतिरिक्त मुख्य सचिव (शहरी विकास विभाग) असीम गुप्ता म्हणाले की, नागरिकांना प्रकल्पाचा फायदा मिळावा आणि राज्यातील हा प्रदेश वाहतूक-केंद्रित पद्धतीने विकसित व्हावा यासाठी हे आवश्यक आहे.