वृत्तसंस्था : बांग्लादेशातील धार्मिक सौहार्द पुन्हा एकदा रक्तरंजित घटनांनी हादरले आहे. हिंदू मंदिरांवर हल्ल्यांची मालिका थांबते की नाही, याची चिंता असतानाच आता सूफी दर्ग्यांवरही हिंसक जमावाने तोडफोड आणि जाळपोळ केली आहे. कुमिल्ला जिल्ह्यातील होमन उपजिल्ह्यात गुरुवारी झालेल्या या घटनांमध्ये तीन दर्गे जाळण्यात आले, एका निरपराध व्यक्तीचा मृत्यू झाला तर तब्बल २२ जण गंभीर जखमी झाले.
या साऱ्या प्रकरणाची सुरुवात सोशल मीडियावरून झाली. कफीलुद्दीन शाह या सूफी संताच्या नातवाने मोहसीन याने इस्लाम व पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी फेसबुकवर लिहिल्याचा आरोप आहे. ही पोस्ट व्हायरल होताच स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली. पोलिसांनी मोहसीनला ताब्यात घेतलं, परंतु लोकांचा राग शांत झाला नाही. पोलिसांनी मोहसीनवर कारवाई केली, आश्वासनही दिले; मात्र तणाव वाढतच गेला. काही तासांतच एका मशिदीतून लाऊडस्पीकरवरून घोषणा करण्यात आली आणि क्षणार्धात मोठा जमाव रस्त्यावर उतरला. संतप्त लोकांनी थेट मोहसीनच्या घरावर धाव घेतली, पण नंतर हा राग दर्ग्यांवर वळला. भावनांचा उद्रेक एवढा तीव्र होता की कफीलुद्दीन शाह, हवेली शाह आणि अब्दु शाह या तीन आदरणीय सूफी संतांच्या दर्ग्यांना आग लावण्यात आली. अचानक पेटलेल्या हिंसेमुळे परिसरात भीतीचं सावट पसरलं. पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करून जमावावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. काही तासांच्या संघर्षानंतर परिस्थिती नियंत्रणात आली, मात्र त्याआधी तीनही दर्गे जळून खाक झाले होते. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, हिंसेत सामील लोकांवर कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे.