मुंबई : मुंबई महानगर प्रदेशात पावसामुळे उद्भवणारी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) पावसाळी नियंत्रण कक्ष सुरू केला जाणार आहे. हा कक्ष १ जूनपासून सुरू होणार आहे. त्यामुळे एमएसआरडीसीच्या हद्दीत आपत्कालीन स्थितीत नागरिकांना या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येणार आहे.
हा नियंत्रण २४ तास कार्यरत राहणार असून एमएसआरडीसीचे अधिकारी आणि अभियंता उपलब्ध असतील. एमएसआरडीसीच्या अखत्यारितील मुंबई महानगर प्रदेशातील विविध उड्डाणपुलांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी एमएसआरडीसीच्या अभियांत्रिकी विभागाकडे आहे. मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षासोबतच मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी महापालिकांच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाबरोबर एमएसआरडीसीच्या नियंत्रण कक्षाचा समन्वय राहील, असे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हा नियंत्रण कक्ष ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहील. या कालावधीत आपत्कालीन स्थितीत संपर्कासाठी नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक ०२२-२६४२०९१४ अथवा मोबाईल क्रमांक ८९२८१२८४०६ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.