नवी मुंबई : लघुशंकेसाठी थांबलेला असताना चार अनोळखी ईसमांनी धक्काबुक्की व मारहाण करून रोख रक्कम आणि मोबाईल जबरीने खेचून चोरी केल्याची घटना पुणे – मुंबई एक्सप्रेस वे, जेएनपीटी पनवेल एक्झिट येथे घडली आहे. या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अविनाश मारुती धारपवार राहणार वनवेवाडी खालापूर आणि मंगेश भाऊ पवार राहणार लिंबोड दांडवाडी खालापूर यांना अटक करण्यात आली.
कळंबोली येथील दयाशंकर जगदीश नारायण मिश्रा हे एमएच ४६ एएफ ९२२० या गाडीवर चालक म्हणून काम करतात. ते वाघोली पुणे येथून ट्रकमध्ये माल भरून जेएनपीटी न्हावाशेवा येथे जाण्यास निघाले. पुणे – मुंबई एक्सप्रेस वे वरील जेएनपीटी पनवेल एक्झिट येथे त्यांनी गाडी थांबवली. लघुशंका केल्यानंतर ते गाडीत बसत असताना दोन ईसमानी त्यांना खेचले व रस्त्याच्या खाली गवतामध्ये ढकलून दिले. त्या ठिकाणी आणखी दोन इसम होते. हे चारही इसम यांनी मिश्रा यांना हाताने मारहाण केली व रोख रक्कम सात हजार रुपये, एक मोबाईल आणि आधार कार्ड, लायसन्स जबरीने घेऊन ते फरार झाले. मिश्रा यांनी आरडा ओरडा केला असता ते तिथून पळून गेले. पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तालुका पोलिसांनी अविनाश धारपवार आणि मंगेश पवार यांना अटक केली यातील दोन आरोपी फरार आहेत.