वृत्तसंस्था : दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचा बहुप्रतीक्षित ‘ये प्रेम मोल लिया’ हा कौटुंबिक चित्रपट २७ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला २४ नोव्हेंबरच्या रात्रीपासून सुरुवात झाली असून, पहिल्या आठवड्यासाठी ४,८१० शोमधून तब्बल ३७,७५० तिकिटांची विक्री झाली आहे. कोणतीही जागा आरक्षित न ठेवता चित्रपटाने आतापर्यंत १.०३ कोटी रुपयांची कमाई केली असून, पहिल्या दिवसाच्या बुकिंगमधूनच ३७.१८ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. तिकिटाची सरासरी किंमत २७५ रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र आणि दिल्ली-एनसीआरमध्ये चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच २० लाख रुपयांहून अधिक कमाई केली आहे. राजस्थानमध्ये १४.५ लाख, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी ७ लाखांपेक्षा अधिक, तर पंजाबमध्ये ५ लाखांपेक्षा जास्त कमाई झाली आहे. या आकडेवारीमुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता असल्याचे स्पष्ट होत आहे.
चित्रपटात आयुष्मान खुराना आणि शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत असून, त्यांच्या सोबत सुप्रिया पाठक, सीमा पाहवा, श्रुती सेठ आणि अनुपम खेर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचा कालावधी २ तास ५३ मिनिटांचा असून, यशराज फिल्म्सकडून त्याचे वितरण करण्यात येत आहे. हिमेश रेशमिया यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. चित्रपटाची कथा एका वेगळ्या प्रेमकथेवर आधारित आहे. ट्रेलरमध्ये आयुष्मानचे पात्र शर्वरीच्या प्रेमात पडल्याचे दाखवण्यात आले आहे. शर्वरीही त्याच्या प्रेमाचा स्वीकार करते; मात्र आपल्या घरातील जबाबदाऱ्यांमुळे ती लग्नासाठी नकार देते. तिच्या कुटुंबात केवळ महिलाच असल्याने ती घर सोडू शकत नसल्याचे ती सांगते. त्यानंतर आयुष्मान आपल्या कुटुंबाला समजावून सांगत तिच्याशी लग्न करण्यासाठी स्वतःच तिच्या घरी राहण्याचा निर्णय घेतो. या अनोख्या कथानकामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढली असून, ट्रेलरलाही प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

