मुंबई : एलपीजी तसेच अन्य ज्वलनशील वायूंची टँकरमधून ढाबे किंवा अनधिकृत गोदामांमध्ये होणारी अवैध उतराई आणि गॅस चोरी हा सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर धोका आहे. अशा अवैध ठिकाणांवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. त्याचबरोबर अशा प्रकरणांमध्ये वाहनमालकांना विनाकारण आर्थिक नुकसान सहन करावे लागू नये, यासाठी जप्त केलेली वाहने प्रतिज्ञापत्र किंवा हमीपत्र घेऊन तातडीने सोडण्याबाबत कायदेशीर तरतुदी तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ट्रक, टँकर आणि बल्क एलपीजीची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांच्या विविध प्रश्नांवर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अवर सचिव सुनीलसिंग निकम, वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष सुरेश खोसला तसेच अन्य प्रतिनिधी उपस्थित होते.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या टँकर अपघाताच्या पार्श्वभूमीवर वाहतूकदारांच्या प्रतिनिधींनी एलपीजी, प्रोपिलीन यांसारख्या ज्वलनशील पदार्थांची अवैध उतराई, टँकरचालकांकडून होणारी चोरी आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य दुर्घटनांचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी मंत्री सरनाईक यांनी या प्रकारांची गंभीर दखल घेतली. ज्वलनशील पदार्थ टँकरमध्ये चढविणे आणि उतरविणे ही प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक असते. यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ आणि आवश्यक तांत्रिक खबरदारी गरजेची आहे. मात्र, ढाबे किंवा अनधिकृत गोदामांमध्ये अशा प्रकारे गॅसची उतराई केल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे अवैध उतराई करणारे टँकरचालक, गॅस स्वीकारणारे ढाबा किंवा गोदाममालक आणि या व्यवहारात सहभागी असलेल्या अन्य व्यक्तींविरुद्ध पोलीस तसेच संबंधित विभागांनी लागू कायदेशीर तरतुदींनुसार कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश सरनाईक यांनी दिले. दरम्यान, अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत जप्त केलेले टँकर दीर्घकाळ अडकून राहत असल्याने वाहनमालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा मुद्दा वाहतूकदारांनी बैठकीत मांडला. यावर तोडगा काढण्यासाठी प्रतिज्ञापत्र, हमीपत्र किंवा बाँड घेऊन जप्त वाहने तातडीने सोडण्याच्या कायदेशीर पर्यायांची संबंधित विभागांनी तपासणी करावी, असे सरनाईक यांनी सांगितले. तसेच यासंदर्भातील विद्यमान कायदेशीर तरतुदींमध्ये आवश्यक बदल करण्याबाबत संबंधित विभागासोबत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. वाहतूक क्षेत्राशी संबंधित विविध विभागांच्या प्रश्नांचा नियमित आढावा घेण्यासाठी प्रस्तावित आंतरविभागीय स्थायी समितीच्या प्रस्तावाची सद्यस्थिती तपासण्याचे निर्देशही परिवहन मंत्र्यांनी दिले. या समितीच्या माध्यमातून दर तीन महिन्यांनी बैठक आयोजित करून वाहतूकदारांच्या समस्या सोडविण्यासाठी निश्चित कार्यपद्धती तयार करावी, असेही त्यांनी सांगितले.

