मुंबई : परदेशातील नोकरीचे आमिष दाखवून बनावट व्हिसाद्वारे भारतातील बेरोजगार तरूणांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील मुख्य आरोपींना पश्चिम बंगाल येथून अटक करण्यात आली. या आरोपींकडून ४८२ पारपत्र हस्तगत करण्यात आले. पतित पबन पुलीन हालदर (३६) व मोहम्मद ईलीयास अब्दुल सत्तार शेख मन्सुरी (४९) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे. आरोपींनी बनावट कॉलसेंटर चालवून देशभरातील अनेकांची फसवणूक केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागली आहे. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बॉम्बे इंटरनॅशनल कन्सलटन्सी व इंडियन ओव्हरसीज या नावाने प्लेसमेंट एजन्सी कार्यालय उघडून भारतातील विविध राज्यातील तरुणांना अझरबैझन, ओमान, दुबई, सौदी अरेबीया, कतार व रशिया या परदेशात नोकरीचे आमिष दाखवले. परदेशातील वेगवेगळ्या नामांकित कंपनीत नोकरीच्या नावाखाली तरुणाचे पारपत्र मुंबईतील वेगवेगळ्या कार्यालयात जमा करून घेतले. त्यानंतर तरुणांना नामांकित कंपन्यांचे बनावट ऑफर लेटर व संबंधित देशांचा बनावट वर्क व्हिझा व्हॉट्स अॅपव्दारे पाठवून विश्वास संपादन केला. त्या मोबदल्यात तरुणांकडून प्रत्येकी ४० ते ६० हजार रूपये वेगवेगळया बँक खात्यावर स्विकारले. अशाप्रकारे आरोपीनी अनेक तरूणांकडून पैसे उकळले. मात्र त्याला नोकरी दिली नाही शिवाय त्यांचे पासपोर्टही स्वतःकडे ठेवून त्यांची फसवणूक केली.
आरोपींनी कार्यालय बंद करून पसार होताच तरुणांनी पोलिसांत धाव घेतली आणि याप्रकरणी तक्रार केली. त्यानुसार, एम.आर.ए. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. गुन्हे शाखेनेही समांतर तपास सुरू केला. गुन्हे शाखेने पाच पथके स्थापन करून यापूर्वीच पाच आरोपीना दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून अटक केली होती. फसवणूक झालेल्या व्यक्तींची एकूण ६२ पारपत्रे, अझरबैझन देशाचे एकूण ७ बनावट व्हिझा, स्टिकर्स व कागदपत्रे, ५ संगणक व संगणकीय साहीत्य, कलर प्रिंटर, ५ टेलिफोन व ७ मोबाइल फोन इंटरनेट कनेक्शन राउटर, विविध कंपन्याचे १४ मोबाइल सीम कार्ड, ३ विविध रबरी शिक्के, विविध बँकांचे १० डेबीट कार्ड, ६ धनादेश पुस्तिका व पासबुक असे गुन्ह्यात वापरण्यात आलेले साहित्य हस्तगत करण्यात आले होते. या कारवाईपाठोपाठ गुन्हे शाखेने या टोळीच्या मुख्य दोन आरोपीना पश्चिम बंगाल येथून अटक केली आहे. आरोपीकडून फसवणूक झालेल्या तरुणांचे ४८२ मूळ पारपत्र जप्त करण्प्यात आले आहेत. आतापर्यंत या गुन्ह्यात ७ आरोपीना अटक करून एकूण ५४४ पारपत्र हस्तगत करण्यात गुन्हे शाखेला यश आले. आरोपींनी किमान ५०० च्या वर नागरिकांची फसवणूक केल्याचा संशय आहे. नोकरीच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी आरोपींनी वापरलेली २६ बँक खाती गोठवण्यात आली आहेत. या बँक खात्यांद्वारे आरोपींच्या व्यवहारांची माहिती घेण्याऐ काम सुरू असल्याचे उपायुक्त (गुन्हे) राज तिलक रौशन यांनी सांगितले. दोन्ही आरोपी १६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहे.