नवी दिल्ली : २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने बुधवारी आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली. महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने अंतिम फेरीत चीनचा पराभव करत देशाला स्पर्धेतील सातवे सुवर्णपदक मिळवून दिले. ज्योती सुरेखा वेन्नम, पृथिका प्रदीप आणि चिकिता थानिपर्थी यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने अंतिम सामन्यात शानदार कामगिरी करत चीनवर २३८-२३४ असा विजय मिळवला. विशेष म्हणजे भारताने या सामन्यात २३८ गुणांची विश्वविकमी कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या विजयासह भारताने २०२३ मध्ये हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेतेपद कायम राखले. महिला कंपाउंड तिरंदाजीमध्ये भारताचे हे सलग दुसरे सुवर्णपदक ठरले आहे. तसेच २०१४ मध्ये दक्षिण कोरियाने नोंदवलेल्या जागतिक आणि आशियाई विक्रमाची भारताने बरोबरी केली आहे.
अंतिम फेरीपूर्वी झालेल्या उपांत्य सामन्यात भारताला दक्षिण कोरियाचे कडवे आव्हान मिळाले होते. या रोमांचक लढतीत भारताने दक्षिण कोरियाचा २३४-२३३ असा अवघ्या एका गुणाने पराभव केला. सामन्याच्या एका टप्प्यावर दक्षिण कोरियाने जोरदार पुनरागमन करत गुणसंख्या १७५-१७५ अशी बरोबरीत आणली होती. मात्र, भारतीय खेळाडूंनी संयम राखत शेवटच्या फेऱ्यांमध्ये अचूक निशाणा साधला आणि विजय मिळवला. चिकिता आणि पृथिका यांनी प्रत्येकी १० गुणांची कामगिरी केली, तर ज्योती सुरेखा वेन्नमने ९ गुण मिळवत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. महिला कंपाउंड तिरंदाजीमध्ये भारताचा प्रवास गेल्या काही वर्षांपासून सातत्यपूर्ण राहिला आहे. २०१४ मध्ये या प्रकाराचा आशियाई क्रीडा स्पर्धेत समावेश झाल्यापासून भारताने प्रत्येक स्पर्धेत पदक पटकावले आहे. २०१४ मध्ये कांस्यपदक, २०१८ मध्ये रौप्यपदक आणि त्यानंतर २०२३ व २०२६ मध्ये सलग दोन सुवर्णपदके भारताने जिंकली आहेत. ३० वर्षीय ज्योती सुरेखा वेन्नम या चारही पदकविजेत्या संघांचा भाग राहिल्या आहेत. या सुवर्णपदकामुळे भारताच्या एकूण पदकसंख्येत भर पडली असून पदकतालिकेत भारताने नवव्या स्थानावर झेप घेतली आहे. याआधी मंगळवारी महिला ४x४०० मीटर रिले संघाने ऐतिहासिक कामगिरी करत भारताला स्पर्धेतील सहावे सुवर्णपदक मिळवून दिले होते.
महिला कंपाउंड तिरंदाजी संघाचा सुवर्णप्रवास :
- मंगोलियाचा पराभव : २३८ गुणांसह विश्वविक्रमाची बरोबरी
- कझाकस्तानचा पराभव
- दक्षिण कोरियाचा पराभव : २३४-२३३ असा एका गुणाने विजय
- चीनचा पराभव : २३८-२३४ असा विजय आणि सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब

