मुंबई : दहिसर–अंधेरी पश्चिम मेट्रो २-अ मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या प्रवासी, पर्यटक, उद्योजक आणि मुंबईबाहेरून कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी लवकरच एक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहे. अंधेरी पश्चिम मेट्रो स्थानकावर पॉड हॉटेल (कॅप्सूल हॉटेल) विकसित करण्यात येत असून पुढील महिन्याभरात ते प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या सुविधेमुळे मेट्रो स्थानकातच आराम करण्याची, काही तास विश्रांती घेण्याची तसेच रात्री मुक्काम करण्याची सोय उपलब्ध होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो प्रकल्पांमधून तिकीट विक्रीव्यतिरिक्त महसूल वाढविण्यासाठी विविध व्यावसायिक संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. सध्या मेट्रो २-अ (दहिसर–अंधेरी पश्चिम), मेट्रो ७ (दहिसर–गुंदवली), मेट्रो ९ टप्पा-१ (दहिसर–काशीगाव) आणि मेट्रो २-ब टप्पा-१ (मंडाले–चेंबूर) या चार मार्गिका कार्यरत आहेत. या स्थानकांमधील उपलब्ध जागा भाडेतत्त्वावर दुकाने, व्यावसायिक आस्थापने आणि कंपन्यांना देण्यात येत असून अनेक दुकाने सुरू झाली आहेत. अंधेरी पश्चिम मेट्रो स्थानकावरील ‘मेट्रो बुक्स’ या पुस्तक विक्री केंद्राला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून येथे ₹९९ ते ₹१५० दरम्यान पुस्तके उपलब्ध आहेत. याशिवाय लवकरच मॅकडोनाल्ड्सचे आउटलेटही सुरू होणार आहे. तसेच चारही मार्गिकांवरील आणखी ५२७ व्यावसायिक जागा भाडेतत्त्वावर देण्यासाठी एमएमआरडीएने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
दरम्यान, अंधेरी पश्चिम मेट्रो स्थानकावर विकसित होत असलेल्या पॉड हॉटेलची विशेष चर्चा सुरू आहे. पॉड हॉटेल क्षेत्रातील स्नूझ हाऊस कंपनीकडून या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील महिन्याभरात ते सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या आधुनिक कॅप्सूल हॉटेलमध्ये प्रवाशांना अल्प विश्रांतीपासून रात्रीच्या मुक्कामापर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. स्वच्छ, सुरक्षित आणि आरामदायी पॉड्स, आवश्यक सुविधा आणि मध्यवर्ती स्थान यामुळे नोकरदार, व्यावसायिक, पर्यटक तसेच ट्रान्झिट प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. विशेषतः अंधेरीसारख्या गजबजलेल्या आणि महत्त्वाच्या व्यावसायिक परिसरात मेट्रो स्थानकातच मुक्कामाची सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवाशांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचण्यास मदत होणार आहे. मेट्रो स्थानकांना केवळ प्रवासाचे केंद्र न ठेवता त्यांना बहुउद्देशीय सेवा केंद्र म्हणून विकसित करण्याच्या एमएमआरडीएच्या प्रयत्नांतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

