मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ महिला व बालविकास विभागाने व्यापक स्वरूप दिले आहे. या महिनाभर चालणाऱ्या अभियानात राज्यातील प्रत्येक अंगणवाडी केंद्रात ‘अंगणवाडी उत्सव’ आयोजित करण्यात येणार असून महिला, बालके, किशोरवयीन मुली आणि स्थानिक नागरिकांचा सक्रिय सहभाग घेतला जाणार आहे. या माध्यमातून आरोग्य, पोषण, सामाजिक सुरक्षा आणि महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली जाईल. पात्र लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून त्यांची नोंदणी, तसेच त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भाजपनेही याच कालावधीत देशभर ‘सेवा मेरा योगदान’, ‘सेवा सेतू’, ‘आशीर्वाद का दिया’, ‘नमो सेवा गाथा’ आणि रक्तदान शिबिरांसह विविध सेवाभावी उपक्रम राबविण्याची घोषणा केली असून, मुंबईसह राज्यभर हे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागानेही आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
या अभियानाअंतर्गत महिला आणि किशोरवयीन मुलींसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिरे भरविण्यात येणार असून रक्तक्षय तपासणी, मासिक पाळीतील स्वच्छतेबाबत जनजागृती आणि आरोग्य मार्गदर्शन केले जाईल. माता आणि पालकांना बालकांचे लसीकरण, वाढ, स्तनपान, पूरक आहार आणि सर्वांगीण विकासाबाबत समुपदेशन करण्यात येणार असून गरज भासल्यास महिला व बालकांना आरोग्य संस्थांकडे संदर्भित करण्याची जबाबदारी अंगणवाडी यंत्रणेकडे असेल. महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत महिलांना स्वयं-सहायता गट, कौशल्यविकास, उद्योजकता आणि उपजीविकेच्या योजनांशी जोडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच ‘आशीर्वादाचा दिवा’ या उपक्रमाअंतर्गत शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना सेवा आणि आवश्यक मार्गदर्शन देण्यात येणार आहे. या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा आणि महिला-बालकल्याणाशी संबंधित सेवा अधिक प्रभावीपणे घराघरांत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
