शिर्डी : लोकशाही व्यवस्थेत विविध मागण्यांसाठी आंदोलने, उपोषणे आणि वेगवेगळ्या प्रकारे शासनाचे लक्ष वेधले जाते. मात्र, शिर्डीत सुरू असलेल्या एका साईभक्ताच्या आमरण उपोषणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ येथील रहिवासी, साईबाबांचे निस्सीम भक्त आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थक रमेश कुमार महाजन यांनी शिर्डीत अनोख्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः शिर्डीत येऊन साईबाबांच्या पालखीला खांदा द्यावा, हीच त्यांची एकमेव मागणी असून ती पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे. ६५ वर्षीय महाजन यांनी यंदा भोपाळ ते शिर्डी असा तब्बल ३१ ते ३२ दिवसांचा पायी प्रवास करत साईबाबांची पालखी खांद्यावर घेतली. अनेक अडचणींवर मात करत ते ९ सप्टेंबर रोजी कोपरगावमार्गे शिर्डीत दाखल झाले. त्यानंतर प्रशासनाची परवानगी घेऊन नगर-मनमाड महामार्गालगत उपोषण सुरू केले. महाजन यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या या आंदोलनामागे २०१३ मधील एक नवस आहे. त्या काळात नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत आणि देशाची सेवा करावी, अशी प्रार्थना त्यांनी साईबाबांच्या चरणी केली होती. २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री कार्यालय आणि पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार करून आपली भावना कळवली होती. ते लहानपणापासून साईभक्त असून वयाच्या १७व्या वर्षी प्रथम शिर्डीत दर्शनासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी अनेकदा भोपाळ-शिर्डी पदयात्रा केली. २०१४ मध्ये साईबाबांची मूर्ती डोक्यावर घेऊन तर पुढील काळात दत्त भगवानाची मूर्ती घेऊनही त्यांनी पदयात्रा केली. २०२४ च्या निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत या प्रार्थनेसाठी त्यांनी भोपाळहून उलटे चालत पदयात्रा सुरू केली होती. मात्र काही अडचणींमुळे पुढे सरळ चालत त्यांनी ती पूर्ण केली. २०२३ मध्ये त्यांनी भोपाळ येथे एकाच दिवशी १५ हजार लोकांना खिचडीचे भोजनही दिले होते. यंदाची पालखी यात्रा ही साईचरणी केलेल्या नवसपूर्तीसाठी असल्याचे त्यांनी सांगितले.
महाजन यांनी स्पष्ट केले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीत येऊन स्वतः साईबाबांच्या पालखीला खांदा दिल्यानंतरच ते आपले उपोषण मागे घेतील. ही मागणी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची त्यांची भूमिका आहे. त्यांच्या मते, पंतप्रधानांनी शिर्डीत येऊन पालखीला खांदा दिल्यास जगभरातील साईभक्तांच्या भावनांचा सन्मान होईल आणि शिर्डीच्या विकासालाही सकारात्मक चालना मिळेल. त्यांनी केलेली ही मागणी कोणत्याही राजकीय किंवा प्रशासकीय धोरणाशी संबंधित नसून वैयक्तिक श्रद्धा, नवस आणि साईबाबांवरील विश्वासाशी जोडलेली असल्याचे ते सांगतात. लोकशाही व्यवस्थेत विविध कारणांसाठी आंदोलने होत असली तरी वैयक्तिक श्रद्धेतून उभे राहिलेले हे आंदोलन वेगळे ठरत आहे. एका सामान्य साईभक्ताने आपल्या नवसपूर्तीसाठी देशाच्या पंतप्रधानांनी साई पालखीला खांदा द्यावा, अशी मागणी करत आमरण उपोषण सुरू केल्याने या आंदोलनाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. प्रशासन या आंदोलनाची कोणती दखल घेते आणि पुढे काय भूमिका घेतली जाते, याकडे साईभक्तांसह सर्वांचे लक्ष लागले आहे. एका बाजूला ६५ वर्षीय साईभक्ताची श्रद्धा, सलग ३२ दिवसांची पदयात्रा आणि नवसपूर्तीचा निर्धार आहे, तर दुसऱ्या बाजूला देशाच्या पंतप्रधानांशी संबंधित ही अनोखी मागणी आहे. त्यामुळे रमेश कुमार महाजन यांच्या आंदोलनाचा पुढील प्रवास काय होणार, याबाबत शिर्डी परिसरात आणि साईभक्तांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
