नाशिक : साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर वर्षभर भाविकांची मोठी गर्दी असते. आगामी कुंभमेळा २०२७ लक्षात घेऊन येथे येणाऱ्या भाविकांना अधिक सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी घाटरस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेत १० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत एकूण १७ दिवस सप्तशृंगी गड–नांदुरी घाटमार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. कश्मीरा संखे यांनी याबाबत अधिकृत आदेश जारी केले आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात विविध तीर्थक्षेत्रांवर विकासकामे सुरू असून, सप्तशृंगी गडावरील हा घाटरस्ता भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या मार्गाचे काँक्रिटीकरण तातडीने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सप्तशृंगी गडाकडे जाण्यासाठी हा एकमेव घाटमार्ग असल्याने काम सुरू असताना वाहतूक सुरू ठेवणे सुरक्षित आणि व्यवहार्य नसल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. घाटरस्त्यावर जड यंत्रसामग्री, काँक्रिटीकरणाची कामे आणि मर्यादित जागा यामुळे वाहनांची ये-जा सुरू ठेवल्यास अपघाताचा धोका वाढू शकतो. तसेच या मार्गाला कोणताही पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने नागरिकांच्या आणि भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाच्या मते, सलग १७ दिवस रस्ता पूर्णपणे बंद ठेवल्यास काम जलद गतीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण होऊ शकेल. त्यामुळे भविष्यात कुंभमेळा तसेच इतर धार्मिक उत्सवांच्या काळात लाखो भाविकांना अधिक सुरक्षित, सुकर आणि आरामदायी प्रवासाचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, या कालावधीत सर्व संबंधित शासकीय यंत्रणा, स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच प्रवासाचे नियोजन करताना वाहतूक बंदीची नोंद घ्यावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. कश्मीरा संखे यांनी केले आहे.

