वृत्तसंस्था : योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने विमा क्षेत्रात अधिकृत प्रवेश केला असून, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने मॅग्मा जनरल इन्शुरन्सच्या अधिग्रहणाला मंजुरी दिली आहे. सुमारे ४,५०० कोटी रुपयांच्या या व्यवहारानंतर पतंजली वित्तीय सेवा क्षेत्रातही आपली उपस्थिती मजबूत करणार आहे. या व्यवहारानुसार पतंजली आयुर्वेद मॅग्मा जनरल इन्शुरन्समध्ये ७३.५६ टक्के हिस्सा खरेदी करून प्रमुख प्रवर्तक (Promoter) बनणार आहे, तर ‘रजनीगंधा’साठी प्रसिद्ध धर्मपाल सत्यपाल (DS) ग्रुपकडे २४.५ टक्के हिस्सा असेल. या दोन्ही संस्थांकडे मिळून कंपनीतील सुमारे ९८ टक्के मालकी राहणार आहे. हा हिस्सा अदार पूनावाला यांच्याशी संबंधित सानोती प्रॉपर्टीज आणि इतर विद्यमान गुंतवणूकदारांकडून खरेदी करण्यात येत आहे. IRDAI ने दिलेली मंजुरी पुढील तीन महिन्यांसाठी वैध असून, या कालावधीत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पतंजलीच्या नेतृत्वाखाली विमा सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. मॅग्मा जनरल इन्शुरन्स ही ‘नॉन-लाईफ’ विमा कंपनी असल्यामुळे ग्राहकांना आरोग्य विमा, वाहन विमा, मालमत्ता विमा तसेच व्यावसायिक विमा यांसारख्या विविध सेवा उपलब्ध राहतील. विशेष म्हणजे पतंजलीचे देशभरात दोन लाखांहून अधिक रिटेल काउंटर्स आणि मेगा स्टोअर्सचे विस्तृत जाळे असल्याने ग्रामीण आणि निमशहरी भागात विमा सेवा अधिक वेगाने पोहोचवण्याचा कंपनीचा मानस आहे.
पतंजलीच्या प्रवेशामुळे आरोग्य विमा क्षेत्रात काही नवीन सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मॅग्मा जनरल इन्शुरन्सच्या विद्यमान आरोग्य विमा योजनांमध्ये आयुर्वेद, योग, युनानी, सिद्धा आणि होमिओपॅथी (AYUSH) उपचारांचा समावेश आहे. त्यामुळे पतंजलीच्या सहभागानंतर आयुर्वेदिक उपचारांना अधिक प्राधान्य मिळण्याची तसेच पतंजली योगपीठ आणि इतर संलग्न आरोग्य संस्थांमध्ये कॅशलेस उपचार किंवा विशेष सवलतीसारख्या सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अशा संभाव्य सुविधांची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. सध्या मॅग्मा जनरल इन्शुरन्सकडे देशभरात ११,५०० हून अधिक नेटवर्क रुग्णालये असून, कॅशलेस हॉस्पिटलायझेशनची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय काही योजनांमध्ये रुग्णालयातील खोलीच्या भाड्यावर मर्यादा नसणे, गंभीर आजारांचे संरक्षण, प्रसूती खर्च, विम्याची रक्कम पुन्हा उपलब्ध करून देणारे रिस्टोरेशन बेनिफिट तसेच ओपीडी खर्चाचे कव्हरेज अशा सुविधा दिल्या जातात. या अधिग्रहणामुळे पतंजलीला विमा क्षेत्रात मोठे स्थान मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, ग्रामीण भागातील विमा संरक्षणाचा विस्तार करण्यासही या व्यवहाराची मदत होऊ शकते.

